बांगलादेशने न्यूझीलंडला न्यूझीलंडमध्ये हरवत रचला इतिहास

तिसऱ्या वनडेत किवीज संघ 98 धावांवर ऑलआऊट : 15 षटकांत बांगलादेशने जिंकला सामना वृत्तसंस्था/ नेपियर, न्यूझीलंड क्रिकेट जगतातील एक मोठा उलटफेर करताना बांगलादेशने न्यूझीलंडचा न्यूझीलंडमध्ये पराभव करण्याची किमया केली. बांगलादेशने वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच न्यूझीलंडला धूळ चारली. उभय संघात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने किवीज संघाला अवघ्या 98 धावांवर गुंडाळले. यानंतर विजयासाठीचे आव्हान 15.1 षटकांत […]

बांगलादेशने न्यूझीलंडला न्यूझीलंडमध्ये हरवत रचला इतिहास

तिसऱ्या वनडेत किवीज संघ 98 धावांवर ऑलआऊट : 15 षटकांत बांगलादेशने जिंकला सामना
वृत्तसंस्था/ नेपियर, न्यूझीलंड
क्रिकेट जगतातील एक मोठा उलटफेर करताना बांगलादेशने न्यूझीलंडचा न्यूझीलंडमध्ये पराभव करण्याची किमया केली. बांगलादेशने वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच न्यूझीलंडला धूळ चारली. उभय संघात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने किवीज संघाला अवघ्या 98 धावांवर गुंडाळले. यानंतर विजयासाठीचे आव्हान 15.1 षटकांत पूर्ण करत हा सामना जिंकला. या विजयासह बांगलादेशने न्यूझीलंडची मायदेशातील 17 वनडे सामन्यांची विजयी मालिका खंडित केली. न्यूझीलंडने हा सामना गमावला असला तरी मालिका मात्र 2-1 फरकाने जिंकली. याआधी पहिला व दुसरा वनडे सामना किवीज संघाने जिंकला होता.
नेपियर येथे झालेल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी पूर्णपणे योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या भेदक माऱ्यासमोर यजमान किवीज संघाचा डाव 31.4 षटकांत 98 धावांत आटोपला. न्यूझीलंडकडून सलामीवीर विल यंगने 26 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. कर्णधार लॅथमने 21 तर क्लार्कसनने 16 धावा केल्या. इतर फलंदाजांनी मात्र बांगलादेशी गोलंदाजांसमोर पूर्णपणे शरणागती पत्कारली. बांगलादेशकडून शरीफुल इस्लाम, तनझिम हसन शाकिब आणि सौम्या सरकार यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. मुस्तफिझूरने एक विकेट घेतली.
बांगलादेशचा सहज विजय
99 धावांचे किरकोळ आव्हान बांगलादेशने अवघ्या 15.1 षटकांत 1 गडी गमावत पार केले. सलामीवीर सौम्या सरकार 4 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. यानंतर अनामुल हक व कर्णधार नजमुल हुसेन शांते यांनी दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी साकारत संघाच्या विजयाचा पाया रचला. अनामुलने 7 चौकारासह 37 तर कर्णधार शांतोने 8 चौकारासह नाबाद 51 धावा केल्या. लिटन दास 1 धावेवर नाबाद राहिला. दरम्यान, क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने न्यूझीलंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर वनडे सामन्यात पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी बांगलादेशने न्यूझीलंडमध्ये त्यांच्याविरुद्ध 19 सामने खेळले, त्यातील हा पहिला विजय ठरला आहे.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 31.4 षटकांत सर्वबाद 98 (विल यंग 26, टॉम लॅथम 21, शरिफुल इस्लाम, तनझिम हसन व सौम्या सरकार प्रत्येकी तीन बळी)
बांगलादेश 15.1 षटकांत 1 बाद 99 (अनामुल हक 37, नजमूल हुसेन नाबाद 51, लिटन दास नाबाद 1, विल्यम 1 बळी).
मालिका मात्र न्यूझीलंडकडे
तिसऱ्या वनडेत जरी बांगलादेशने विजय मिळवला असला तरी तीन सामन्यांची वनडे मालिका यजमान न्यूझीलंडने 2-1 फरकाने जिंकली. पहिल्या वनडेत न्यूझीलंडने डीएलएस पद्धतीने 44 धावांनी विजय मिळवला होता तर दुसऱ्या सामन्यातही त्यांनी 7 गड्यांनी बाजी मारली होती. त्यानंतर तिसरा सामना मात्र त्यांनी 9 गड्यांनी गमावला.