लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याला दणका

लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याला दणका

कंत्राटी पदासाठी मागितले एक लाख रुपये : मंत्री रोहन खंवटे यांनी घेतली गंभीर दखल,ध्वनिफित सर्वत्र व्हायरल झाल्याने खळबळ 
पणजी : इन्फोटेक कॉर्पोरेशन या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सरकारी महामंडळात कंत्राट पद्धतीवर कर्मचारी भरतीसाठी खात्यातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने एक लाख रुपयांची लाच मागितल्याची ध्वनीफित उघडकीस आल्यानंतर राज्यात काल मंगळवारी एकच खळबळ माजली आणि सायंकाळी आयटी मंत्रालयाने संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ केला. मंगळवारी पहाटेच ही ध्वनिफित उघडकीस आली आणि समाज माध्यमांवर संपूर्ण गोव्यात सर्वत्र प्रसारित झाली. त्यातून दिवसभरात एकच चर्चा सुरू झाली. सरकारी कामासाठी पैसे मागितले जातात, या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू झाली.
मंत्री खंवटेंकडून गंभीर दखल
या खात्याचे मंत्री रोहन खवटे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला. तज्ञांनी ही ध्वनीफित ऐकल्यानंतर त्यातील आवाज मिळताजुळता व त्यातील संभाषणही खरे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सदर अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्याचा आदेश जारी केला. रात्री उशिरापर्यंत यासंबंधीची प्रक्रिया सुरू होती.
यापूर्वी घेतली किती लाच?
या संपूर्ण प्रकरणाची सरकारने गंभीरपणे नोंद घेतल्यामुळेच ही कारवाई शक्य झाली आहे, अन्यथा यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यात झालेल्या घोटाळ्याची शेवटपर्यंत चौकशी झालेली नव्हती. आयटी क्षेत्राचे हे प्रकरण सकाळपासून संपूर्ण गोव्यात गाजले होते. आता कारवाई केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्याने यापूर्वी आणखी किती जणांकडून पैसे घेतले होते, याची माहिती देखील सरकारला अपेक्षित आहे.