घाल घाल पिंगा वाऱ्या

घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात माहेरी जा, सुवासाची कर बरसात! “सुखी आहे पोर”- सांग आईच्या कानात “आई, भाऊसाठी परी मन खंतावत! विसरली का ग, भादवात वर्स झालं, माहेरीच्या सुखाला ग, मन आचवलं.

घाल घाल पिंगा वाऱ्या

घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात

माहेरी जा, सुवासाची कर बरसात!

 

“सुखी आहे पोर”- सांग आईच्या कानात

“आई, भाऊसाठी परी मन खंतावत!

 

विसरली का ग, भादवात वर्स झालं,

माहेरीच्या सुखाला ग, मन आचवलं.

 

फिरून-फिरून सय येई, जीव वेडावतो

चंद्रकळेचा ग, शेव, ओलाचिंब होतो.

 

काळ्या कपिलेच्या नंदा खोडकर फार,

हुंगहुंगुनिया करी कशी ग, बेजार!

 

परसात पारिजातकाचा सडा पडे,

कधी फुलं वेचायला नेशील तू गडे ?

 

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय

माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय…!”

 

आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला

माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला!

 

कवी – कृ. ब. निकुंब