बैलहोंगल तालुक्याला पावसाचा तडाखा

बैलहोंगल तालुक्याला पावसाचा तडाखा

पिकांचे -घराचे प्रचंड नुकसान : गुरुवारी रात्रभर पावसाचा मारा
वार्ताहर /बाळेकुंद्री
बैलहोंगल व परिसरातील नावलगट्टी, तिगडी, संपगाव भागात गुरुवारी सायंकाळी व रात्रीच्या सुमारास एक तासाहून अधिक झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी  मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने परिणामी वरील गावात व शिवारात  पावसाने हाहाकार माजवत सर्वत्र पाणीच पाणी केले आहे. विजेचा कडकडाटांसह वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळल्याने अनेक घरांची हानी झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर शिवारातील भाजीपाला पिके जमीनदोस्त झाले आहेत.वादळी पावसामुळे मोठ्या नावलगट्टी, तिगडी, संपगाव भागात पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गटारीचे पाणी गावात शिरून तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
शाळेचे नुकसान
पावसामुळे विजेची चकमक, ढगांचा गडगडाट व सोसाट्याचा वाऱ्यामुळे तालुक्यातील नावलगट्टी येथील सरकारी लोअर प्राथमिक शाळेचे पत्रे, लोखंडी सळ्या उडून पडल्याने नुकसान झाले आहे. पत्रे उडाले तेव्हा मैदानात कोणीही नव्हते. तसेच शाळेची उन्हाळी सुटी सुरू असल्याने सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. गावातील अनेकांचे घराचे पत्रे तर वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे छप्पर उडून गेले आहेत.