मडगावच्या उपनगराध्यक्षपदासाठी बबिता नाईक यांचे नाव आघाडीवर

मडगाव : मडगाव पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाचा दीपाली सावळ यांनी राजीनामा दिला असल्याने सत्ताधारी भाजपच्या गटात त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी सध्या काही नावे समोर येत असली, तरी नगरसेविका बबिता नाईक यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळाली आहे. सावळ यांनी उपनगराध्यक्षपदाचे राजीनामापत्र मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्याकडे दिले होते. सदर राजीनामापत्र पालिका संचालकाच्या कार्यालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती सूत्रानी […]

मडगावच्या उपनगराध्यक्षपदासाठी बबिता नाईक यांचे नाव आघाडीवर

मडगाव : मडगाव पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाचा दीपाली सावळ यांनी राजीनामा दिला असल्याने सत्ताधारी भाजपच्या गटात त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी सध्या काही नावे समोर येत असली, तरी नगरसेविका बबिता नाईक यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळाली आहे. सावळ यांनी उपनगराध्यक्षपदाचे राजीनामापत्र मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्याकडे दिले होते. सदर राजीनामापत्र पालिका संचालकाच्या कार्यालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती सूत्रानी दिली. 25 सदस्यीय मडगाव पालिकेतील 16 सदस्यीय सत्ताधारी गटावर आमदारांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. कामत आणि फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक यांच्याकडे उत्तराधिकारी निवडण्याचे  काम आहे. मडगाव आणि फातोर्डा असा कोणताही भेदभाव पालिकेत नसून सत्ताधारी गट एक आहे आणि उपनगराध्यक्ष निवडण्याचे काम भाजपाची कोअर कमिटी करणार आहे, असे कामत यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, प्रामुख्याने एसटी समाजातील नगरसेवकाला उपनगराध्यक्षपद देण्याचा विचार भाजपातील काही नगरसेवक करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. नगरसेविका मिलाग्रिना गोम्स यांचे नाव उपनगराध्यक्षपदासाठी पुढे केले जाऊ लागले आहे. मात्र नगरसेविका गोम्स यांची कार्निव्हल समितीच्या अध्यक्ष म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे तसेच त्या रवींद्र भवन समितीवर सदस्य म्हणून आहेत. फातोर्डा मतदारसंघातील अन्य भाजप नगरसेवकांना विविध अधिकारिणींवर नियुक्त करण्यात आले आहे. मात्र नगरसेविका बबिता नाईक यांना कोणतेही पद दिलेले नाही तसेच त्यांना उपनगराध्यक्षपद देण्याचे आश्वासन भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिले होते. त्यामुळे त्यांनी आपल्याला उपनगराध्यक्षपद द्यावे याकरिता जोर लावला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सावळ यांचे राजीनामापत्र ग्राह्य ठरल्यानंतर सदर पद रिक्त होणार आहे. त्यानंतरच नूतन उपनगराध्यक्ष निवडीसाठीची प्रक्रिया वेग घेईल, अशी चिन्हे दिसून येत आहेत.