अयोध्या : राम मंदिरासाठी असं बदलतंय शहराचं रुपडं

1992 मध्ये बाबरी मशीद विध्वंस आणि त्याठिकाणी राम मंदिराच्या निर्मितीपासून उत्तर प्रदेशचं अयोध्या हे शहर कायमच वादाच्या केंद्रस्थानी राहिलेलं आहे.

अयोध्या : राम मंदिरासाठी असं बदलतंय शहराचं रुपडं

1992 मध्ये बाबरी मशीद विध्वंस आणि त्याठिकाणी राम मंदिराच्या निर्मितीपासून उत्तर प्रदेशचं अयोध्या हे शहर कायमच वादाच्या केंद्रस्थानी राहिलेलं आहे.

 

या प्रकरणी 2019 मध्ये सुप्रीम कोर्टानं अयोध्येत बाबरी मशिदीच्या वादग्रस्त ठिकाणी राम मंदिर निर्मितीची परवानगी दिली. त्यानंतर मंदिर तयार करण्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली आणि वेगानं त्याचं काम करण्यात आलं.

 

सध्या मंदिराचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराचं उद्घाटन करतील. याचदिवशी कुंभाभिषेक नावाचा प्राणप्रतिष्ठा सोहळाही आयोजित करण्यात आला आहे.

 

यासाठी ‘अयोध्या विकास योजना’ नावानं केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे सुमारे 30 हजार कोटी रुपयांची विकासकामं करत आहेत. त्याचा परिणाम म्हणजे आधी एक छोटं आणि गर्दीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अयोध्येचा चेहरा मोहरा वेगानं बदलत आहे.

 

अयोध्येत नेमके काय बदल होत आहेत हे जाणून घेण्यासाठी बीबीसीनं थेट तिथं पोहोचून माहिती घेतली.

 

अयोध्येत सगळीकडे रामायणातील प्रतिकं

अयोध्या शहरामध्ये प्रवेश करताच स्वागतासाठी प्रत्येक घराच्या आणि इमारतीच्या वर श्रीरामाचं चित्र किंवा फोटो असलेले भगवे झेंडे दिसतात. मुख्य रस्त्यांवर रामायणाच्या पात्रातील मूर्ती आहेत.

 

राम मंदिराकडं जाणाऱ्या शहराच्या 13 किलोमीटर लांबीच्या ‘राम पथ’ या मुख्य रस्त्यावर विविध ठिकाणी विविधं चिन्हं, प्रतिकं, आकर्षक रोषणाईच्या माध्यमातून सजावट करण्यात आली आहे.

 

सरकारच्या मते रामपथ, भक्तीपथ, धर्मपथ आणि जन्मभूमी पथ या चार मुख्य मार्गांचं रुंदीकरण केलं जात आहे.

 

सध्या अयोध्येत प्रवेश करण्याच्या रामपथ या मुख्य मार्गावर नवीन बांधकामं आणि विकासकामं पाहायला मिळतात.

 

रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेली घरं आणि दुकानांची रंगरंगोटी करून चमकावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे सर्वांना सारख्या पिवळ्या रंगात रंगवलं आहे.

 

सर्व दुकानांच्या शटरवर त्रिशूळ, हनुमान, काविक ध्वज आणि जय श्रीराम अशा हिंदु प्रतिकांची चित्रं काढली आहेत.

 

अयोध्येत धार्मिक पर्यटकांची वाढती संख्या

आता अयोध्येत जास्त लोक येऊ लागल्यानं व्यवसायात वाढ होऊ लागली आहे, असं रस्त्याच्या कडेला दुकानं असलेल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं.

 

रामपथ सुरू होतो त्याठिकाणी एक लहान नाश्त्याचं दुकान आहे. त्या दुकानाचे मालक अर्शद शेरा यांनी त्यांना या विकास कामांचा फायदा होत असल्याचं सांगितलं.

 

“याठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून विकासकामं सुरू आहेत. सर्वत्र विकास होत आहे. रस्ते, लाईट, स्वच्छता यामुळं सर्व दुकानांची स्थिती चांगली झाली आहे,” असं अर्शद म्हणाले.

 

“आता आमच्याकडे खूप पर्यटक येतात. आमच्या दुकानावर गिऱ्हाईकही वाढले आहेत,” असं ते म्हणाले.

 

अयोध्येत भाड्यानं कार चालवणारे राजा यांना आधी आठवड्यातून 3-4 भाडी मिळत होती. पण आता त्यांना आठवडाभर भाडी मिळतात.

 

“आधी स्थानिक रहिवासी रुग्णालय आणि नातेवाईकांकडं जाण्यासाठीच कार भाड्यानं घ्यायचे. पण आता इथं येणाऱ्या विदेशी पर्यटकांमुळं आठवडाभर कारला भाडी मिळतात,” असं त्यांनी सांगितलं.

 

अयोध्येत देशाच्या विविध भागांतून लोकांची गर्दी

राम मंदिराकडं जाणाऱ्या रस्त्यांवर अजूनही अनेक ठिकाणी कामं सुरू असून लोकांची या रस्त्यावर वर्दळ पाहायला मिळते.

 

या मार्गावर अनेक लहान-मोठी दुकानं सुरू झाली आहेत. त्यात रामायण ग्रंथ, मूर्ती आणि अनेक गोष्टींची विक्री केली जात आहे.

 

मंदिरात येणारे अनेक लोक कपाळावर ‘जय श्रीराम’ लिहिलेले गंध लावून येत आहेत. या गंधाचे छापे मारणारे अनेक फेरीवाले या मार्गावर पाहायला मिळतात.

 

तमिळनाडूसह दक्षिणेतील अनेक राज्यांतील लोकही याठिकाणी आलेले पाहायला मिळाले.

 

तमिळनाडूच्या वेल्लोरमधून एका ग्रुपबरोबर आलेल्या 56 वर्षीय लक्ष्मी विजयन यांनी 3 दिवसांच्या रेल्वेप्रवासानंतर याठिकाणी पोहोचल्याचं सांगितलं.

 

बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी परिवहन आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

स्थानिक तरुणांचा उत्साह

अयोध्या हे आधी एक लहान शहर म्हणून ओळखलं जात होतं. त्यामुळं याठिकाणी मनोरंजनासाठी फार काही नव्हतं. पण आता बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळं अनेक नवीन रेस्तराँ, पार्क आणि चौकांचा विकास करण्यात आला आहे.

 

त्यामुळं स्थानिक तरुणांमध्ये एक प्रकारचा उत्साह आहे.

 

अराध्या तिवारी या 12 वर्षीय विद्यार्थिनीनं नुकताच कुटुंबासह राम मंदिराचा दौरा केला होता. नव्यानंच तयार करण्यात आलेल्या गुपदार घाट परिसरात ते गेले होते.

 

“पूर्वी अयोध्येत काय आहे, असं म्हटलं जात होतं. पण आता अयोध्येचा चेहराच बदलून गेला आहे. राम मंदिर बनल्यानं शहराचं वातावरणच बदललं,” असं ती म्हणाली.

 

गुपदर घाटावर गेलेल्या 15 वर्षीय विद्यार्थी प्रज्वल तिवारी यानंही तशीच भावना व्यक्त केली.

 

“आधी मित्रांबरोबर फिरण्यासाठी अयोध्यात फार मोजक्या जागा होत्या. पण आता अनेक हॉटेल आणि पार्क बनले आहेत,” असं तो म्हणाला.

 

अयोध्येत नवीन बांधकामं

अयोध्येत नव्या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. कमी प्रमाणात का होईना पण उड्डाणदेखील सुरू झाली आहेत. जुन्या रेल्वे स्थानकाचंही नुतणीकरण आणि इतर नवीन काम करण्यात आलं आहे. तसंच नव्या बस स्थानकाचाही पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

 

राम मंदिराच्या जवळपास 5 किलोमीटरच्या परिसरात सजावटीची आणि विकासाची अनेक कामं पाहायला मिळत आहेत. नवे उड्डाणपूल, नवे शॉपिंग मॉल, पार्किंग तयार केल्या जात आहेत.

 

रस्ते बनवण्याचं कामही वेगात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. 15 तारखेला रस्त्याचं काम पूर्ण होईल असंही सांगितलं जात आहे.

 

दुसरी अयोध्या-जिथं विकास नाही

राम मंदिराच्या आसपासच्या प्रमुख भागामध्ये ‘अयोध्या विकास योजना’ अंतर्गत कामं सुरू आहेत. पण ही विकासकामं शहराच्या मध्यवर्ती भागात आणि अयोध्येच्या इतर जिल्ह्यांत तसंच रहिवासी भागात पोहोचलेली नाहीत.

 

या भागांकडे जाणारे रस्ते खूपच खराब आणि धुळीनं भरलेले आहेत. याठिकाणची बहुतांश घरं लहान आणि कच्ची आहेत.

 

विशेषतः नव्या विमानतळाच्या जवळपास असलेला 2 किलोमीटरचा भाग. बीबीसी तमिळच्या प्रतिनिधींनी या भागाचा दौरा केला. पण मुस्लिम वस्ती असलेल्या या भागात विकास किंवा सुशोभिकरणाचं काहीही काम झालेलं नाही.

 

या परिसरात राम मंदिराच्या परिक्रमेसाठी रामपथ आणि भक्तीपथला जोडणारा एक मार्ग आहे. त्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी काही दुकानं आणि घरं हटवण्यात आली आहेत.

 

त्या घरांच्या मालकांच्या मते त्यांना नुकसान भरपाई मिळाली पण ती पुरेशी नसल्याची त्यांची तक्रार आहे.

 

‘शिक्षण आणि रोजगार गरजेचा’

फैजाबादच्या राहणाऱ्या 32 वर्षीय सिम्मी शिक्षिका म्हणून काम करतात.

 

त्यांच्या मते, त्यांच्या भागात अजूनही पुरेशी विकासकामं झालेली नाहीत. हॉटेल आणि मॉल तयार झाले हे स्वागतार्ह आहे. पण तसं असलं तरी त्यांनी महिलांसाठी शिक्षण आणि रोजगाराची व्यवस्था करणं अपेक्षित आहे.

 

“जस-जसा शहराचा विकास होत जाईल, तसा येथील लोकांच्या शिक्षणाचा स्तरही सुधारणं गरजेचं आहे. इंजिनीअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज यांचाही या मॉल आणि हॉटेलसारखा विकास करायला हवा.

 

“महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी तयार करायला हव्या. तेव्हाच खऱ्या अर्थानं अयोध्या जिल्ह्याचा विकास होईल,” असं सिम्मी म्हणाल्या.

 

‘चुका सुधारणार’

कुरान सिद्दीकी याच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते शिक्षण, सामाजिक सौहार्द आणि जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी काम करतात.

 

अयोध्येत एकिकडं अनेक विकासकामं होत असताना दुसरीकडं अनेक समस्याही आहेत, असं ते म्हणाले.

 

“2019 मध्ये अयोध्येच्या निर्णयानंतर याठिकाणी वेगानं बांधकामं सुरू आहेत. पण जस-जसा विकास होत असतो तशा काही समस्याही निर्माण होतात. त्याकडंही लक्ष द्यायला हवं,” असं सिद्दीकी म्हणाले

 

“शहरात पायाभूत सुविधांची कमतरता आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास, फैजाबादमध्ये सरकारी शिक्षण संस्थांची अवस्था अत्यंत खराब आहे. तसंच नोकऱ्यांचीही कमतरता आहेत. त्यावरही काम व्हायला हवं,” असं ते म्हणाले.

 

“अजूनही लोकांना गंभीर उपचारांसाठी लखनऊला जावं लागतं,” असं ते म्हणाले.

 

‘हळूहळू सर्व क्षेत्रांत सुधारणा करणार’

आम्ही अयोध्या विकास योजनेंतर्गत कामांवर देखरेख ठेवणारे जिल्हाधिकारी (प्रशासक दर्जा) नितीश कुमार यांच्याशी याबाबत चर्चा केली.

 

त्यावर ते म्हणाले की, विकासकामं लघु मुदत, मध्यम मुदत आणि दीर्घ मुदत या तीन टप्प्यांमध्ये केली जात आहेत. सध्या फक्त पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झालं आहे. अंतर्गत कामं जानेवारीपर्यंत पूर्ण होतील. तर दीर्घकालीन कामं सुरू राहतील, असं ते म्हणाले.

 

कामं न झालेल्या फैजाबादसारख्या भागांबाबतही त्यांना विचारण्यात आलं. त्यावर जिल्ह्याचे बाहेरचे भाग आणि उपनगरांमध्ये संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विकासकामं केली जात आहेत, असं ते म्हणाले.

 

दशरथ मेडिकल कॉलेज रुग्णालयात 200 बेड वाढवल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

 

पर्यटनाच्या क्षेत्रात सुधारणा करून स्थानिक लोकांसाठी सेवा क्षेत्रात रोजगार निर्माण करण्यासाठी योजना लागू केली जाईल.

 

ते म्हणाले की, “लोकांच्या घरांमध्ये पेइंग गेस्ट सारख्या निवासाच्या सुविधा निर्माण करण्याची योजना आणि पर्यावरण पर्यटनासाठीच्या योजनाही लागू केल्या जातील.”

 

या ठिकाणी सर्व कामं ‘अयोध्या 2047’ योजने अंतर्गत सुरू आहेत.

 

Published By- Priya Dixit 

Go to Source