पावसाचे कारण पुढे करत लेंडी नाल्याची सफाई टाळली

डिसेंबरनंतर काम करण्याचे मनपा अधिकाऱ्यांकडून आश्वासन बेळगाव : लेंडी नाला साफसफाई करण्याबाबत कृषी मंत्र्यांचे पत्र महानगरपालिकेला आल्यानंतर महानगरपालिकेकडून शेतकरी संघटनेला नाल्याची सफाई करण्याबाबत पत्र पाठविण्यात आले. याचबरोबर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन पाहणी केली. मात्र आता पाऊस सुरू असल्यामुळे तातडीने काम सुरू करणे अशक्य असल्याचे सांगत डिसेंबरपासून काम सुरू करू असे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. यामुळे यावर्षीही लेंडी नाला परिसरातील […]

पावसाचे कारण पुढे करत लेंडी नाल्याची सफाई टाळली

डिसेंबरनंतर काम करण्याचे मनपा अधिकाऱ्यांकडून आश्वासन
बेळगाव : लेंडी नाला साफसफाई करण्याबाबत कृषी मंत्र्यांचे पत्र महानगरपालिकेला आल्यानंतर महानगरपालिकेकडून शेतकरी संघटनेला नाल्याची सफाई करण्याबाबत पत्र पाठविण्यात आले. याचबरोबर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन पाहणी केली. मात्र आता पाऊस सुरू असल्यामुळे तातडीने काम सुरू करणे अशक्य असल्याचे सांगत डिसेंबरपासून काम सुरू करू असे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. यामुळे यावर्षीही लेंडी नाला परिसरातील शेतकऱ्यांना फटका बसणार हे निश्चित झाले.
लेंडी नाल्यावर असलेल्या पुलाला पाण्याचा निचरा होण्यासाठी पाच बॉक्स आहेत. मात्र या लेंडी नाल्याचे पाणी पुढे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाला केवळ दोनच बॉक्स बसविण्यात आले आहेत. त्यामुळे शहराला महापूर येत आहे. महत्त्वाचे म्हणजे हा नाला 30 फूटचा असून त्या नाल्यावर काही जणांनी अतिक्रमण केले आहे. काही ठिकाणी केवळ 6 फुटाचाच नाला शिल्लक आहे. त्यामुळे या नाल्यावरील अतिक्रमणही हटवावेत, अशी मागणी केली आहे.
सध्या पावसामुळे या नाल्याचे पाणी राष्ट्रीय महामार्गाशेजारी असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर वाहात आहे. यावरून पाण्याचा निचरा होत नसल्याचे अधिकाऱ्यांच्या नजरेला दाखवून देण्यात आले. या नाल्यातील पाणी शिवारात जाऊन पिकांचे नुकसान झाले. त्याची नुकसानभरपाई शेतकऱ्यांनी मागितली असता तहसीलदारांकडे पाठपुरावा करून ही नुकसानभरपाई घ्यावी, असे त्यांनी सांगितले. शहर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी या नाल्याच्या खोदाईसाठी गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. माजी आमदार अनिल बेनके यांनी या नाल्याच्या खोदाईसाठी तसेच फुटलेला नाला दुरुस्त करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र ते काम अर्धवट झाले. त्यानंतर याकडे कोणीच लक्ष दिले नाही. आता पुन्हा नारायण सावंत यांनी पाठपुरावा केल्यामुळे महानगरपालिकेकडे पत्र आले आहे.