कांगारुंची धमाकेदार सुरुवात

सलामीच्या सामन्यात ओमानवर 39 धावांनी मात : सामनावीर मार्क स्टोइनिसची अष्टपैलू खेळी वृत्तसंस्था /ब्रिजटाऊन, वेस्ट इंडिज आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. सलामीच्या सामन्यात मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने ओमानचा 39 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या विजयात मार्क स्टोइनिसने महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रथम, स्टॉइनिसने विस्फोटक फलंदाजी केली आणि नंतर गोलंदाजी करताना 3 बळी […]

कांगारुंची धमाकेदार सुरुवात

सलामीच्या सामन्यात ओमानवर 39 धावांनी मात : सामनावीर मार्क स्टोइनिसची अष्टपैलू खेळी
वृत्तसंस्था /ब्रिजटाऊन, वेस्ट इंडिज
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. सलामीच्या सामन्यात मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने ओमानचा 39 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या विजयात मार्क स्टोइनिसने महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रथम, स्टॉइनिसने विस्फोटक फलंदाजी केली आणि नंतर गोलंदाजी करताना 3 बळी घेतले. कांगारुंनी प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 164 धावा केल्या. यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना ओमानला 9 बाद 125 धावा करता आल्या. या विजयासह ऑस्ट्रेलियाला दोन गुण मिळाले आहेत.
बार्बाडोस येथे झालेल्या सामन्यात ओमानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ओमानचा गोलंदाजीचा निर्णय पहिल्या डावातील पहिल्या 10 षटकांसाठी प्रभावी वाटत होता, मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी गियर बदलून आक्रमक फलंदाजी सुरु केली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 20 षटकात 5 विकेट गमावत 164 धावा केल्या आणि ओमानला 165 धावांचे लक्ष्य दिले. प्रारंभी, ऑसी संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर टेव्हिस हेड 12 धावा काढून बाद झाला. यानंतर कर्णधार मिचेल मार्श व ग्लेन मॅक्सवेलही अपयशी ठरले. मार्श 12 धावांवर बाद झाला तर मॅक्सवेलला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर डेव्हिड वॉर्नर व मार्क स्टोइनिस या जोडीने शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. वॉर्नरने शानदार खेळी साकारताना 51 चेंडूत 6 चौकार व 1 षटकारासह 56 धावा केल्या. स्टोइनिसने ओमानच्या गोलंदाजांची धुलाई करताना 36 चेंडूत 2 चौकार व 6 षटकारासह नाबाद 67 धावांचे योगदान दिले. ओमानकडून गोलंदाजीत मेहरान खानने सर्वाधिक 2 विकेट्स घेतले.
ऑसी गोलंदाजांचा प्रभावी मारा
धावांचा पाठलाग करताना ओमानची सुरुवात निराशाजनक झाली. दोन्ही सलामी फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. प्रतीक आठवलेला मिचेल स्टार्कने गोल्डन डकवर परत पाठवले, तर कश्यप प्रजापतीही स्वस्तात बाद झाला. त्याने 16 चेंडूंचा सामना करत केवळ 7 धावा केल्या. अयान खानने सर्वाधिक 36 धावा केल्या. मेहरान खानने 27 तर कर्णधार अकिब इलियासने 18 धावा केल्या. सलग अंतरावर विकेट्स पडल्या.