रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर विजय
शेवटच्या चेंडूवर डेव्हिडचा विजयी चौकार, सामनावीर मार्शचे नाबाद अर्धशतक, रवींद्र-कॉनवेची अर्धशतके वाया
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान न्यूझीलंडचा 6 गड्यांनी विजय मिळवित मालिकेत आघाडी घेतली. 44 चेंडूत नाबाद 72 धावा फटकावणाऱ्या मिचेल मार्शला सामनावीर पुरस्कार देण्यात आला तर टिम डेव्हिडनेही केवळ 10 चेंडूत नाबाद 31 धावा झोडपत विजयात मोलाची भूमिका बजावली.`
न्यूझीलंडने 3 बाद 215 धावा जमविल्याने ऑस्ट्रेलियाला या सामन्यात 215 धावांचे आव्हान मिळाले होते. शेवटच्या षटकांत त्यांना 16 धावांची गरज असताना साऊदीचा पहिला चेंडू वाईड पडला. त्यानंतर अधिकृत पहिल्या चेंडूवर मार्शने लेगबाय घेतली. दुसऱ्या चेंडूवर डेव्हिडने एक धाव घेतल्यानंतर मार्शने आणखी एक लेगबाय घेतली. चौथ्या चेंडूवर मात्र डेव्हिडने लाँगलेगच्या दिशेने उत्तुंग षटकार ठोकला. पाचव्या चेंडूवर त्याने पुन्हा दोन धावा घेतल्यामुळे शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 4 धावांची गरज होती आणि डेव्हिडने त्यावर डीप कव्हरच्या दिशेने शानदार चौकार ठोकत ऑस्ट्रेलियाचा रोमांचक विजय साकार केला. डेव्हिडने केवळ 10 चेंडूत 2 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 31 धावा झोडपल्या. कर्णधार मिचेल मार्शनेही कप्तानी खेळी करीत 44 चेंडूत 2 चौकार, 7 षटकारांसह नाबाद 72 धावा फटकावल्या.
याशिवाय टॅव्हिस हेडने 15 चेंडूत 24, डेव्हिड वॉर्नरने 20 चेंडूत 1 चौकार, 3 षटकारांसह 32, ग्लेन मॅक्सवेलने 11 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांह 25, जोश इंग्लिसने 20 चेंडूत 20 धावा काढल्या. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना फारसा प्रभाव टाकता आला नाही. मिचेल सँटनरने 2, अॅडम मिल्ने व लॉकी फर्ग्युसन यांना एकेक बळी मिळविता आला.
तत्पूर्वी, रचिन रवींद्र व देव्हॉन कॉनवे यांनी अर्धशतके नोंदवत न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी निवडल्यावर 20 षटकांत 3 बाद 215 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. रवींद्रने 35 चेंडूत 2 चौकार, 6 षटकारांसह 68 धावा फटकावत टी-20 मधील पहिले अर्धशतक नोंदवले. कॉनवेने त्याला चांगली साथ देताना 46 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 63 धावा जमविल्या. या दोघांनी उत्तम प्रदर्शन केले तरी ऑस्ट्रेलियाने रोमांचक ठरलेल्या अखेरच्या टप्प्यात विजयाचे उद्दिष्ट गाठण्यात यश मिळविले.
येत्या जूनमध्ये अमेरिका व विंडीजमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी दोन्ही संघांची ही शेवटची टी-20 मालिका असल्याने त्याच्या तयारीसाठी ही शेवटची संधी आहे. मार्शने फक्त फलंदाजीतच नव्हे तर गोलंदाजीतही त्याने 21 धावांत एक बळी मिळविला. न्यूझीलंडच्या डावात सलामीवीर फिन अॅलनने 17 चेंडूत 32, ग्लेन फिलिप्सने 10 चेंडूत नाबाद 19, मार्क चॅपमनने 13 चेंडूत नाबाद 18 धावा फटकावल्या. स्टार्क, कमिन्स, मार्श यांनी एकेक बळी मिळविला. या मालिकेतील उर्वरित दोन सामने ऑकलंडमधील ईडन पार्क येथे होणार आहेत. त्यानंतर दोन कसोटींची मालिका होणार आहे. दुसरा टी-20 सामना शुक्रवारी होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 20 षटकांत 3 बाद 215 : अॅलन 17 चेंडूत 2 चौकार, 3 षटकारांसह 32, कॉनवे 46 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 63, रचिन रवींद्र 35 चेंडूत 2 चौकार, 6 षटकारांसह 68, फिलिप्स 10 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह नाबाद 19, चॅपमन 13 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 18, अवांतर 15. गोलंदाजी : स्टार्क 1-39, कमिन्स 1-43, मार्श 1-21.
ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 4 बाद 216 : हेड 15 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 24, वॉर्नर 20 चेंडूत 1 चौकार, 3 षटकारांसह 32, मार्श 44 चेंडूत 2 चौकार, 7 षटकारांसह नाबाद 72, मॅक्सवेल 11 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 25, इंग्लिस 20 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 20, टिम डेव्हिड 10 चेंडूत 2 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 31, अवांतर 12. गोलंदाजी : सँटनर 2-42, फर्ग्युसन 1-23, मिल्ने 1-51.
.
Home महत्वाची बातमी रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर विजय
रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर विजय
शेवटच्या चेंडूवर डेव्हिडचा विजयी चौकार, सामनावीर मार्शचे नाबाद अर्धशतक, रवींद्र-कॉनवेची अर्धशतके वाया वृत्तसंस्था/ वेलिंग्टन शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान न्यूझीलंडचा 6 गड्यांनी विजय मिळवित मालिकेत आघाडी घेतली. 44 चेंडूत नाबाद 72 धावा फटकावणाऱ्या मिचेल मार्शला सामनावीर पुरस्कार देण्यात आला तर टिम डेव्हिडनेही केवळ 10 चेंडूत नाबाद 31 धावा झोडपत विजयात मोलाची भूमिका […]