आणखी तीन खाण ब्लॉकांचा 15 दिवसांत लिलाव

यंदापासून रेती काढण्याचे परवाने : जुने गोवे येथे येणार वस्तूसंग्रहालयाची इमारत पणजी : येत्या 15 दिवसांत आणखी तीन खाण ब्लॉकांचा लिलाव करण्यात येणार आहे. आतापर्यंत एकूण 9 खाणींच्या मालाचा लिलाव करण्यात आला असून, त्यातील 1 खाण सुरू झाली आहे. डंप मालाचा लिलाव ऑक्टोबरपर्यंत सुरू होण्याबरोबरच पूर्ण क्षमतेने खाण व्यवसाय सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. […]

आणखी तीन खाण ब्लॉकांचा 15 दिवसांत लिलाव

यंदापासून रेती काढण्याचे परवाने : जुने गोवे येथे येणार वस्तूसंग्रहालयाची इमारत
पणजी : येत्या 15 दिवसांत आणखी तीन खाण ब्लॉकांचा लिलाव करण्यात येणार आहे. आतापर्यंत एकूण 9 खाणींच्या मालाचा लिलाव करण्यात आला असून, त्यातील 1 खाण सुरू झाली आहे. डंप मालाचा लिलाव ऑक्टोबरपर्यंत सुरू होण्याबरोबरच पूर्ण क्षमतेने खाण व्यवसाय सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभा सभागृहात दिली. शिक्षण खाते, खाण, विमान वाहतूक आदी खात्यांच्या मागण्यांवर चर्चा झाल्यानंतर सभागृहात या खात्याच्या मागण्यांना सभागृहात मान्यता देण्यात आली. दक्षिण गोव्यात 2 तर उत्तर गोव्यात 1 अशा 3 खाण ब्लॉकांचा लिलाव येत्या 15 दिवसांत होईल. तसेच सरकारच्या डम्प धोरणानुसार ऑक्टोबरपर्यंत डम्प मालाचा लिलाव होईल. ज्यामुळे पूर्ण क्षमतेने खाण व्यवसाय सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
दाबोळी विमानतळ बंद पडणार नाही 
रेतीची समस्या दूर करण्यासाठी यंदाच्या वर्षी रेती काढण्याचे परवाने देण्यास सुरुवात होईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सभागृहात सांगितले. मोपा विमानतळावर 1 हजार 900 गोमंतकीय युवकांना काम देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. दाबोळी विमानतळ कोणत्याही परिस्थितीत बंद पडणार नाही. दाबोळी विमानतळ सेवा शुल्क कमी करण्याची मागणी सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे, असे मुख्यमंत्री सभागृहात म्हणाले. जुने गोवा या ठिकाणी 10 हजार चौरस मीटर जागेत वस्तूसंग्रहालयाची इमारत उभी राहणार आहे. या वस्तूसंग्रहालयाच्या इमारतीसाठी केंद्राकडून 10 कोटींचे अनुदान मिळणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सभागृहात सांगितले. गोवा विद्यापीठाच्या नजिकच फार्मसी महाविद्यालयाची नवीन वास्तू उभी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू झाले असून, त्याचबरोबर वास्तुविशारद महाविद्यालय इमारतही या ठिकाणी उभी राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सांगे येथे आयआयटीसाठी प्रयत्न  
आयआयटी शिक्षणासाठी सरकारने अजूनपर्यंत जागा निश्चित केलेली नाही. लवकरच जागा निश्चित केली जाणार आहे. सांगे या ठिकाणी आयआयटीसाठी जागा निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
नववीच्या विद्यार्थ्यांना नापास करण्याचे प्रकार 
विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागावा यासाठी काय अनुदानित शैक्षणिक संस्थाकडून नववीच्या विद्यार्थ्यांना नापास करण्याचे प्रकार घडलेले आहेत. हे प्रकार शोधण्यासाठी विद्यार्थ्यांचे ट्रेकिंग सुरू करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सभागृहात सांगितले.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कार्यवाही 
राष्ट्रीय शिक्षण धोरणाची नियोजनबद्ध कार्यवाही योग्य पद्धतीने सुरू आहे. सरकार कार्यवाहीची घाई करीत नसून, पूर्व प्राथमिक स्तरावरील (फाउंडेशन पद्धती) राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कार्यवाही सुरू झालेली आहे. अंगणवाडीचा विषय अजून स्पष्ट झालेला नाही. आतापर्यंत 752 पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी झालेली आहे. सर्व शिक्षकांना सरकारने प्रशिक्षण दिलेले आहे. यंदाच्या वर्षी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कार्यवाही सुरू झाली आहे.  फ्रेंच, पोर्तुगीज आणि जर्मन भाषा घेण्याची मोकळीक आहे. यंदाच्या वर्षी नववीपासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कार्यवाही सुरू झाली आहे. नववीच्या 10 विषयांपैकी 6 विषयांचे पेपर शालान्त मंडळ काढेल. इतर 4 विषयांचे पेपर विद्यालयात काढण्यात येतील.पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यवर्धन शिक्षण सुरू झाले आहे. शाळांच्या इमारतींची दुऊस्ती ऑक्टोबरपर्यंत सुरू होईल, सरकारमार्फत चालविण्यात येणाऱ्या बालरथासाठी आम्ही नवीन योजना सुरू करणार आहोत, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सभागृहात सांगितले. त्याचबरोबर राज्यातील 1 लाख 62 हजार 557 मुलांना माध्यान्ह आहार देण्यात येतो. त्यासाठी 728.48लाख ऊपये सरकार खर्च करते, असेही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.
आदिवासींच्या रिक्त जागा कधी भरणार : सरदेसाई
1 हजार 136 आदिवासींच्या जागा रिक्त आहेत. त्या कधी भरणार असा प्रश्न विजय सरदेसाई यांनी सभागृहात विचारल्यानंतर येत्या एका वर्षात आम्ही या सर्व जागा भरण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. शैक्षणिक पात्रतेनुसार टप्प्याटप्प्याने ह्या जागा भरल्या जातील. शिवाय काही जागा लोकसेवा आयोगामार्फतही भरल्या जातील, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. तसेच पर्वरी या ठिकाणी आदिवासी भवनही लवकरच उभारण्यात येईल, त्यासाठी कार्यवाही सुरू झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
लाडू देऊ नका, दाबोळी द्या : युरी आलेमाव
दाबोळी विमानतळावरील विमानसेवा मोपा येथे वळविण्यात आल्या आहेत. त्यासंबंधी मुख्यमंत्री सावंत यांनी सभागृहात सत्य माहिती द्यावी. त्यावर मुख्यमंत्र्यांनी केवळ दोन विमानसेवा वळविण्यात आल्याचे सांगितले. परंतु या विधानावर युरी आलेमाव व विजय सरदेसाई यांनी वादंग निर्माण करून दोन विमानसेवा नव्हे, सहा विमानतळ वळविल्याचे सभागृहात सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी करीत सरकारने आम्हाला लाडू न देता दाबोळी विमानतळ द्यावा, अशी मागणी केली.