शहरात भटक्या कुत्र्यांचे हल्ले चिंताजनक
मनपा अपयशी, नागरिक भीतीशी : बेवारस कुत्र्यांचा प्रश्न गंभीर
प्रतिनिधी/ बेळगाव
शहर परिसरात मोकाट कुत्री चावण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. मागील दोन दिवसांत पाच जणांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरासह जिल्ह्यात मागील चार वर्षांत 70 हजारांहून अधिक घटनांची नोंद झाली आहे. त्यामुळे कुत्र्यांचे वाढते हल्ले शहरवासियांसाठी चिंताजनक ठरू लागले आहेत. त्यामुळे आता प्रशासन आणि मनपा याबाबत गांभीर्य घेणार का? हे पहावे लागणार आहे.
महांतेशनगर आणि कणबर्गी परिसरात भटक्या कुत्र्यांनी पाच जणांवर हल्ले केले आहेत. यामध्ये विशेषत: लहान मुलांचा समावेश आहे. कुत्र्यांनी मुलांचे लचके तोडले आहेत. त्यामुळे शहर परिसरात भटक्या कुत्र्यांमुळे भीती निर्माण झाली आहे. कणबर्गी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालून एका लहान मुलाचा चावा घेतला. त्यामुळे कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यात मनपाला अपयश आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात 77 हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. त्यामध्ये बेळगाव शहरात 15 हजार भटक्या कुत्र्यांची नोंद झाली आहे. यामध्ये दरवर्षी पुन्हा भर पडू लागली आहे. शहरातील हॉटेल आणि इतर मांसाहारी विक्रेत्यांकडून टाकावू पदार्थ कचराकुंडी व काही ठिकाणी रस्त्यावरच टाकले जात असल्याने कुत्र्यांची पैदास वाढू लागली आहे.
मनपाची नसबंदी शस्त्रक्रिया केवळ दिखाऊपणा
शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी मनपाकडून नसबंदी प्रक्रिया केली जाते. श्रीनगर येथील केंद्रामध्ये एकावेळी 30 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध आहे. एका कुत्र्याच्या शस्त्रक्रियेसाठी 1600 रुपये खर्च केले जातात. मात्र या सर्व प्रक्रियेनंतर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे मनपाची नसबंदी शस्त्रक्रिया केवळ दिखाऊपणा असल्याचे दिसत आहे.
कुत्र्यांना आवरणार कोण?
शहरात कुत्र्यांनी माणसांवर हल्ले करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. या कुत्र्यांना वेसण कोण घालणार? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. बेवारस कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी पुढाकार कोणी घ्यायचा? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
शहरातील महांतेशनगर, नेहरुनगर, सदाशिवनगर, शहापूर, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक, यंदे खूट आदी ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे गळप फिरताना दिसतात. या कुत्र्यांमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. शिवाय वाहनधारकांनाही धोकादायक ठरू लागली आहेत. शहरात अलीकडे लहान मुले आणि जनावरांवर कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे रेबिजचा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. यातूनच जीवदेखील गमवावा लागत आहे. हे रोखण्यासाठी मनपा कायमस्वरुपी निर्बिजीकरण मोहीम राबविणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
रेबिज प्रतिबंधक लसीकरण मोहीम
पशुसंगोपन खात्यामार्फत रेबिज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवून लस दिली जाते. याबाबत शाळास्तरावरही जागृती केली जात आहे. पाळीव आणि भटक्या कुत्र्यांना प्रतिबंधक लस दिली जाते.
-डॉ. राजीव कुलेर-सहसंचालक पशुसंगोपन
मागील चार वर्षांत कुत्र्यांनी हल्ले केलेल्या घटनांची संख्या-
वर्ष घटना
2020 18826
2021 20362
2022 19215
2023 20122
Home महत्वाची बातमी शहरात भटक्या कुत्र्यांचे हल्ले चिंताजनक
शहरात भटक्या कुत्र्यांचे हल्ले चिंताजनक
मनपा अपयशी, नागरिक भीतीशी : बेवारस कुत्र्यांचा प्रश्न गंभीर प्रतिनिधी/ बेळगाव शहर परिसरात मोकाट कुत्री चावण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. मागील दोन दिवसांत पाच जणांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरासह जिल्ह्यात मागील चार वर्षांत 70 हजारांहून अधिक घटनांची […]