अशोक चव्हाणांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, फडणवीस म्हणतात- आगे आगे देखो होता है क्या
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
आपल्या लेटरहेडवर नावासमोर असलेल्या विधानसभा सदस्य या पदासमोर, पेनाने माजी असे त्यांनी लिहिले आहे.
‘मी दिनांक 12/02/2024 च्या मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे,’ असं पत्र अशोक चव्हाण यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे.
अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याची माहितीही ट्वीट करून दिली आहे.
‘आज सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे,’ असं ट्वीट अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या सगळ्या घडामोडींदरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधानही चर्चेत आलं आहे.
“अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाबद्दल तुमच्याकडूनच ऐकतोय. पण काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. आगे आगे देखो होता है क्या,” असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
आज (12 फेब्रुवारी) मुंबईमधील भाजप कार्यालयात काही जणांचे पक्षप्रवेश झाले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी हे विधान केलं.
अशोक चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
अशोक चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र. शंकरराव प्रशासनात ‘मुख्याध्यापक’ म्हणून ओळखले जात. त्यांचा प्रशासनात दरारा होता. त्यांचे सुपुत्र म्हणून त्यांचा राजकीय वारसा अशोक चव्हाणांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला. वडील आणि मुलगा मुख्यमंत्री असण्याचं महाराष्ट्रातलं हे एकमेव उदाहरण आहे.
28 ऑक्टोबर 1958 रोजी अशोक चव्हाणांचा मुंबई येथे जन्म झाला. बीएसस्सी आणि एमबीए अशी भक्कम शैक्षणिक कारकीर्द त्यांच्या पाठिशी आहे. 1985 मध्ये संजय गांधी निराधार योजनेचे नांदेड शहराचे चेअरमन म्हणून त्यांनी राजकारणातील कारकिर्दीला सुरुवात केली.
शंकरराव चव्हाण 1980 साली पहिल्यांदा नांदेडचे खासदार झाले. त्याआधी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होती. 1987 मध्ये जेव्हा शंकरराव मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांची खासदारपदाची रिक्त जागा अशोक चव्हाणांनी भरून काढली.
प्रकाश आंबेडकरांचा त्यांनी या निवडणुकीत मोठा पराभव केला. त्यावेळी त्यांचं वय फक्त 30 होतं. 1987 ते 1989 या काळात खासदारपदाचा अनुभव घेतल्यावर त्यांनी पक्ष कार्यात भाग घ्यायला सुरुवात केली.
1986-1995 या काळात ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष होते 1989 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये अशोक चव्हाणांना फार महत्त्वाची पदं भूषवता आली नाही. 1999 मध्ये ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द कायम चढत्या क्रमानं झाली.
मुख्यमंत्रिपद आणि राजीनामा
शरद पवार आणि त्यानंतर विलासरावांच्या काळात विविध मंत्रिपदं भूषवल्यानंतर 2008 साली त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद भूषवण्याची संधी मिळाली. 26/11 च्या हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला.
तेव्हा काँग्रेसवासी असलेले नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा होती. मात्र आमदारपदाची कारकीर्द, आणि निष्ठावंतात होणारी गणती या गोष्टी पाहता अशोक चव्हाणांची मुख्यमंत्रीपदावर निवड झाली.
तेव्हा 2009 च्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या. या निवडणुकीतही त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली.
सगळं काही आलबेल असतानाच 2009 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी ‘अशोकपर्व’ नावाच्या पुरवणीसाठी पेड न्यूज देऊन त्याचा खर्च निवडणूक खर्चात न दाखवल्याचा त्यांच्यावर आरोप झाला.
त्याचप्रमाणे कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याप्रकरणी घोटाळ्यात अशोक चव्हाणांचं नाव अडकलं आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं.
2019 साली लोकसभेत पराभव
2014 ला मोदी लाटेत केवळ दोनच खासदार काँग्रेसमधून लोकसभेत गेले होते. एक म्हणजे हिंगोलीचे राजीव सातव आणि दुसरे म्हणजे नांदेडचे अशोक चव्हाण.
पण 2019 मध्ये त्यांना आपली जागा राखता आली नव्हती. आपले कट्टर प्रतिस्पर्धी प्रतापराव चिखलीकर यांनी त्यांचा पराभव केला होता. भाजपच्या तिकिटावरुन चिखलीकरांनी अशोक चव्हाणांना हरवलं होतं.
नांदेड लोकसभा हारण्यामागे आणखी एका महत्त्वाच्या घटकाची भर पडली होती असं सांगितलं जातं. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीतर्फे यशपाल भिंगे यांना एक लाखाहून अधिक मतं मिळाली होती.
ही मतं पारंपरिकदृष्ट्या काँग्रेसचीच होती पण यशपाल भिंगेंना ती मिळाल्यामुळे त्याचा फटका काँग्रेसला बसला आणि प्रतापराव चिखलीकर जिंकून आले होते असं जाणकारांना वाटतं.
Published By- Priya Dixit