शारजाह मास्टर्स : अरविंद चिदंबरम सालेमला नमवून अग्रस्थानी

वृत्तसंस्था/ शारजाह भारतीय ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमने स्थानिक स्टार ए. आर. सालेह सालेमचा पराभव करून येथे चालू असलेल्या शारजाह मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीच्या समाप्तीनंतर 4.5 गुणांसह आघाडी मिळविणारा एकमेव खेळाडू ठरण्यात यश प्राप्त केले आहे. चिदंबरम याच्यापाठोपाठ आता चार खेळाडू आहेत. त्यात अमीन तब्ताबाये आणि बर्दिया दानेश्वर ही इराणी जोडी तसेच अमेरिकन हॅन्स मोके निमन […]

शारजाह मास्टर्स : अरविंद चिदंबरम सालेमला नमवून अग्रस्थानी

वृत्तसंस्था/ शारजाह
भारतीय ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमने स्थानिक स्टार ए. आर. सालेह सालेमचा पराभव करून येथे चालू असलेल्या शारजाह मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीच्या समाप्तीनंतर 4.5 गुणांसह आघाडी मिळविणारा एकमेव खेळाडू ठरण्यात यश प्राप्त केले आहे. चिदंबरम याच्यापाठोपाठ आता चार खेळाडू आहेत. त्यात अमीन तब्ताबाये आणि बर्दिया दानेश्वर ही इराणी जोडी तसेच अमेरिकन हॅन्स मोके निमन आणि सॅम शँकलँड यांचा समावेश असून त्यांचे प्रत्येकी चार गुण झाले आहेत.
अव्वल मानांकित अर्जुन एरिगेसी हा 3.5 गुणांसह आठ खेळाडूंच्या पुढील पंक्तीत आहे आणि त्याला येथे साथ देणारा संकल्प गुप्ता हा आणखी एक भारतीय आहे. 52000 अमेरिकी डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत अजून चार फेऱ्या खेळायच्या बाकी आहेत. तब्बल 16 खेळाडूंचे समान तीन गुण आहेत. या रांगेत भारतीय अभिमन्यू पुराणिक, लिओन ल्यूक मेंडोन्सा, पी. इनियान आणि व्ही. प्रणव यांचा समावेश आहे.
चिदंबरम या लढतीत फॉर्मत राहिला आणि त्याने खेळाच्या सर्व विभागांमध्ये सालेमला सहज चिरडले. सालेमने किंग्ज इंडियन डिफेन्स वापरला होता. पण त्याची डाळ शिजली नाही. हा सामना 48 चाली चालला. एरिगेसीची गाठ रशियाचा उदयोन्मुख खेळाडू व्होलोदर मुर्झिनशी पडली होती. मुर्झिन फिडेच्या ध्वजाखाली या स्पर्धेत खेळत आहे. पारडे जड बनूनही एरिगेसी या लढतीत पुढे बचावात्मक झाला आणि एका टप्प्यावर तर तो अडचणीत आला होता. पण पुढे हा सामना बरोबरीत संपला. संकल्पने आपली प्रभावी वाटचाल चालू ठेवताना अझरबैजानच्या तैमूर रादजाबोव्हला बरोबरीत रोखले. अभिमन्यू पुराणिकला मात्र त्याचा फॉर्म कायम राखता आला नाही आणि इराणच्या अमीन तब्ताबायेकडून तो पराभूत झाला.