अरुणा शानबाग: 50 वर्षांपूर्वी रुग्णालयातील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने हादरला होता महाराष्ट्र
मुंबई.. जगातल्या सर्वांत व्यस्त शहरांपैकी एक. प्रत्येकाची वेगळी धावपळ. कुणाकडेही क्षणाचाही वेळ नाही. पण एवढ्या धावपळीच्या मुंबई शहरात केईएम (किंग एडवर्ड मेमोरियल) हॉस्पिटलमध्ये एक महिला 41 वर्ष निपचित पडून राहिली. बाहेरच्या जगात सुरू असलेल्या धावपळीचा तिला थांगपत्ताच नाही. पण त्या धावपळीपेक्षा जास्त संघर्ष तिच्या आतमध्ये सुरू होता. पण तो त्यांना कुणाला सांगताही येत नव्हता..ती महिला म्हणजे केईएममधील नर्स अरुणा शानबाग.
कोलकाताच्या आर जी कर सरकारी रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. देशभरात त्यावरून संतापाची लाट उसळली आहे.
मुंबईत 50 वर्षांपूर्वी एका रुग्णालयात घडलेल्या अशाच एका घटनेनं अरुणा शानबाग यांचं संपूर्ण जीवन उद्वस्त करून टाकलं. या घटनेनंतर पुढची 41 वर्षे रोज त्याच वेदनांचा सामना त्यांना करावा लागला.
मुंबईच्या केईएम रुग्णालयात नर्स असलेल्या अरुणा शानबाग यांच्यावर रुग्णालयाच्याच एका वार्डबॉयनं हल्ला आणि बलात्काराचा प्रयत्न केला होता. त्यात अरुणा गंभीर जखमी झाल्या होत्या.या घटनेनंतर अरुणा यांना पुन्हा कधीही स्वतःच्या पायावर उभं राहता आलं नाही किंवा कुणाशी दोन शब्द बोलता आले नाही. 41 वर्षे रुग्णालयाच्या एका बेडवर त्या पडून राहिल्या.
अखेर मृत्यूनेच त्यांची या त्रासातून सुटका झाली. कोलकात्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर आपण अरुणा शानबाग आणि त्यांच्याबरोबर घडलेली दुर्घटना याबाबत जाणून घेणार आहोत.
कोण होत्या अरुणा शानबाग?
अरुणा शानबाग यांच्या संपूर्ण प्रकरणाविषयी लेखिला पिंकी विरानी यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. याच पिंकी विरानी यांनी अरुणा शानबाग यांच्या दया मरणाची याचिकाही केली होती.
पिंकी यांनी ‘अरुणाज स्टोरी – द ट्रू अकाऊंट ऑफ अ रेप अँड इट्स आफ्टरमाथ’ या पुस्तकातून अरुणा यांच्या संपूर्ण संघर्षाचं वर्णन केलं होतं. त्यांच्या या पुस्तकाचं काही संशोधन संस्थांनीही मानसिक संशोधनाच्या दृष्टीनं विश्लेषण केलं होतं.
अन्वेशना रिसर्च फाऊंडेशननं केलेल्या अशाच एका रिपोर्टमध्ये हे प्रकरण आणि अरुणा यांच्याबद्दलही बरीचशी माहिती देण्यात आलेली आहे.
त्यानुसार, कर्नाटकातील हलदीपूर या एका लहानशा गावात अरुणा शानबाग यांचा जन्म झालेला होता. त्यावेळी समाजात महिलांकडं ज्यापद्धतीनं पाहिलं जात होतं, त्यापेक्षा अरुणा यांचे विचार मात्र फार प्रगत होते. महिलांनी चार भिंतीच्या आत राहावं किंवा लग्न करून घर सांभाळावं हे त्यांना मान्य नव्हतं. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःच्या पायावर महिलांनी उभं राहायला हवं असं त्यांचं मत होतं.
त्यामुळंच कुटुंबाकडून फारसं प्रोत्साहन मिळालं नसलं तरी अरुणा शानबाग यांनी शिक्षण सुरू ठेवलं आणि त्या जोरावर त्यांनी मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये नर्सची नोकरी मिळवली.
नोकरी मिळाली, स्वतःची कमाई सुरू झाली म्हणून अरुणा तेवढ्यावरच समाधानी नव्हत्या. तर त्यांना पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जायची इच्छा होती. त्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या.
खासगी आयुष्यातही त्या आनंदी वळणावर होत्या. पण त्याचवेळी त्यांचं आयुष्य पूर्णपणे पालटून टाकणारी एक घटना घडली आणि होत्याचं नव्हतं झालं.
हल्लेखोराबरोबर झाला होता वाद
अरुणा यांच्या बरोबर घडलेली घटना ही 27 नोव्हेंबर 1973 च्या रात्रीची आहे. अरुणा केईएम रुग्णालयात काम करत होत्या. त्यांच्यावर याच रुग्णालयात वार्ड बॉय आणि कुत्र्यांच्या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या सोहनलालने हल्ला केला होता.
प्रत्यक्षात सोहनलाल आणि अरुणा यांच्यात झालेल्या वादाची पार्श्वभूमी या घटनेला होती. सोहनलाल कुत्र्यांसाठी आणलेल्या खाद्याची (डॉगफूड)ची चोरी करत असल्याचं अरुणा यांच्या लक्षात आलेलं होतं.
कुत्र्यांना खायला मिळत नाही, तर त्यांचं खाद्य सोहनलाल चोरी करत असल्याचं अरुणा यांना समजलं होतं. त्यावरून त्यांचे वाद झालेले होते. अरुणा यांनी रुग्णालय प्रशासनाकडं याबाबत तक्रारही केलेली होती. याच रागातून सोहनलाल यानं अरुणा यांच्यावर हल्ला केला होता.
नेमके काय घडले?
अरुणा शानबाग यांना दयामरण मिळावं या मागणीसाठी लेखिका पिंकी विरानी यांनी याचिका दाखल केली होती. त्यावरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रत इंडिया कानून नावाच्या संकेतस्थळावर आहे. त्यात त्या रात्री नेमकं काय घडलं होतं याचा उल्लेख आहे.
अरुणा यांच्यावर असलेल्या रागातून आरोपी सोहनलाल 27 नोव्हेंबर 1973 च्या रात्री त्यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशनानेच रुग्णालयात पोहोचला होता.
अरुणा कपडे बदलण्यासाठी येणार हे माहिती असल्यानं सोहनलाल त्याठिकाणी दबा धरून बसला होता. त्यानं अरुणा यांच्यावर हल्ला केला. कुत्र्यांच्या साखळीनं त्यानं अरुणा यांचा गळा आवळला. त्यांना गळा घोटून मारण्याचा त्याचा आरोपीचा प्रयत्न होता.
पण सोहनलालनं हल्ला केल्यानंतर अरुणा यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्या संघर्षामध्ये अरुणा यांचा श्वास कोंडला आणि मेंदूला होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळं त्या बेशुद्ध पडल्या.
सोहनलालनं त्यावेळी त्यांच्यावर लैंगिक अत्याचारही केले होते. अरुणा बेशुद्ध झाल्यामुळं त्यांना मृत समजून त्यांना तशाच अवस्थेत सोडून आरोपी तिथून पळून गेला होता.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 नव्हेंबर रोजी रुग्णालयात सकाळी स्वच्छता कर्मचारी आला. त्यावेळी त्याला अरुणा शानबाग बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर हे प्रकरण समोर आलं.
त्यानंतर अरुणा यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. पण त्यांची अवस्था अत्यंत वाईट होती. अरुणा कोमात (व्हेजिटेटिव्ह स्टेट- निष्क्रिय अवस्था) गेल्या आणि त्यानंतरची जवळपाच चार दशकं त्यांनी त्याच अवस्थेत घालवली.
अरुणा यांच्यावर हल्ला करणाऱ्या सोहनलालवर हत्येचा प्रयत्न आणि बलात्कार प्रकरणी खटला चालवण्यात आला. पण बलात्काराचा आरोप सिद्ध झाला नाही. त्यामुळं त्याला हत्येचा प्रयत्न प्रकरणी 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
इच्छामरणाची मागणी
पत्रकार आणि लेखिका असलेल्या पिंकी विरानी यांनी अरुणा शानबाग यांच्या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला आहे. अरुणा यांना होणाऱ्या वेदनांचा त्यांनाही प्रचंड त्रास व्हायचा.
पिंकी यांनी फेमिनाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्या अरुणा यांना आधी एक पत्रकार म्हणून भेटल्या होत्या. पण नंतर त्या पुन्हा-पुन्हा अरुणा यांना भेटू लागल्या. अरुणा यांच्या वाढदिवसाला त्या केक आणि चॉकलेटही पाठवायच्या.
पण अरुणा यांना बेडवर अशा अवस्थेत पाहून त्यांना खूप वाईट वाटायचं. त्यामुळं 2009 मध्ये त्यांनी अरुणा यांना यातून मुक्त करायचं असा विचार केला. त्यावेळी त्यांनी अरुणा यांच्या इच्छामरणाची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली.
या याचिकेवरून बराच वादविवाद झाला होता. केईएम रुग्णालयातील अरुणा यांची देखभाल करणाऱ्या नर्सेसनं त्यांच्या या मागणीला विरोध केला होता. अरुणा यांच्याबरोबर निर्माण झालेल्या भावनिक नात्यातून या नर्सनं विरोध करत होत्या.
पण अरुणा यांच्या इच्छामरणाची याचिका फेटाळली असली तरी या प्रकरणामुळं भारतात इच्छामरण किंवा पॅसिव्ह युथनेशियाच्या कायद्यात महत्त्वाचा बदल झाला होता. ही अरुणा यांची देशाला भेट होती, असं पिंकी विरानी यांनी फेमिनाशी बोलताना म्हटलं होतं.
नातेवाईक दुरावले, हॉस्पिटलच बनले घर
घटनेनंतर केईएम रुग्णालयातील वार्ड नंबर चारमधील बेड हाच अरुणा यांचा कायमचा पत्ता बनला. अरुणा जवळपास चार दशकं याच ठिकाणी अचेतन अवस्थेमध्ये पडून होत्या.
अरुणा यांच्या नातवाईकांनी त्यांच्याशी असलेले संबंध जवळपास तोडले होते. घटना घडण्यापूर्वी रुग्णालयातील एका डॉक्टरबरोबर अरुणा यांचे प्रेम जुळलेले होते. लवकरच ते लग्नही करणार होते.
पण ही घटना घडल्यानंतर आणि अरुणा यांची बरं होण्याची शक्यता कमी असल्यानं, त्या डॉक्टरांनी दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. त्यामुळं अरुणा यांचं हक्काचं असं कोणीही तिथं नव्हतं. पण त्यांची काळजी घेणाऱ्या नर्स या नकळत त्यांच्या कुटुंबाचा भाग बनल्या होत्या.
रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना, त्यावेळच्या आठवणींबाबत सांगितलं. अरुणा यांचे कोणतेही नातेवाईक नव्हते. पण रुग्णालयातील नर्सचं अरुणा यांच्याशी भावनिक नातं निर्माण झालं होतं, असं ते म्हणाले.
सुपे यांच्या मते, “अरुणा या जवळपास अचेतन अवस्थेत होत्या. कधीतरीच त्या डोळ्यांच्या हालचाली किंवा हावभावांनी संवाद साधायच्या. पण नर्सच्या हाताने अन्न खात होत्या. या सगळ्या नर्सचं त्यांच्याशी अगदी जवळचं भावनिक नातं तयार झालं होतं.”
चार दशकांच्या संघर्षाचा शेवट
रुग्णालयात बेडवर पडून असलेल्या अरुणा शानबाग यांचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. अखेर 18 मे 2015 रोजी त्यांचा निमोनिया आणि इतर कारणांमुळं मृत्यू झाला.
अरुणा शानबाग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यासाठी इच्छामरणाची मागणी करणाऱ्या लेखिका पिंकी विरानी यांनी, अरुणा यांचा आज कायदेशीर मृत्यू झाला, अशी प्रतिक्रिया दिली होती. अरुणा यांना झालेल्या वेदनांच्या पार्श्वभूमीवर पिंकी यांनी अशी भावना व्यक्त केली होती.
अरुणा यांच्या मृत्यूनंतर केईएम रुग्णालयाचे तत्कालीन डीन डॉ. अविनाश सुपे यांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले होते.
डॉ. सुपे म्हणाले की, “सुप्रीम कोर्टाने त्यांच्या आदेशात रुग्णालय प्रशासनानं अंत्यसंस्कार करावे असं म्हटलं होतं. तसंच अरुणा यांच्याशी निर्माण झालेल्या भावनिक नात्यामुळं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचीही आपणच अंत्यसंस्कार करावे अशी इच्छा होती. त्यामुळं सर्व परवानगी घेऊन आणि प्रक्रिया पूर्ण करत त्यांच्या पार्थिवावर आम्ही अंत्यसंस्कार केले होते.”
“अरुणा यांच्या अंत्यंसंस्काराच्या वेळीही त्यांच्या नातेवाईकातील कोणी उपस्थित नव्हतं. फक्त त्यांच्या नात्यातील फार दूरची अशी एक व्यक्ती त्यावेळी उपस्थित होती. त्यांनाही अंत्यसंस्काराच्या विधीत सहभागी करून घेतलं,” असं डॉ. सुपे म्हणाले.
उदासीनतेमुळे सुटला आरोपी?
लेखिका पिंकी विरानी यांनी एका मुलाखतीत केवळ काही लोकांच्या उदासीनतेमुळं एक अत्यंत क्रूर आरोपी बलात्काराच्या प्रकरणातून वाचला अशी प्रतिक्रिया दिली होती.
अरुणा यांच्यावर हल्ला आणि अत्याचार करणाऱ्या आरोपी सोहनलालला हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्याबाबत पिंकी यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.
अरुणा यांच्यावर ज्याप्रकारचे लैंगिक अत्याचार करण्यात आले होते, त्या प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश त्यावेळी बलात्कार प्रकरणांत होत नव्हता. त्यामुळं आरोपीनं बलात्काराचा प्रयत्न केला असं निकालात म्हटलं गेलं होतं.
या प्रकरणाच्या काही वर्षांनंतर जेव्हा निर्भयाचं प्रकरण घडलं आणि त्यानंतर ज्याप्रकारे संताप पाहायला मिळाला, त्यानंतर कायद्यात बदल झाला आणि बलात्कार संबंधी कायदे अधिक कठोर करण्यात आले.
कायद्यांमध्ये झालेले बदल
2012 मध्ये दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर कायद्यात आवश्यक ते बदल करण्यात आले. बलात्काराच्या व्याख्येत अनेक तपशील जोडण्यात आले आहेत.
बलात्काराची धमकी हा आता अपराध मानला जातो. एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारची धमकी दिल्यास त्याला शिक्षा सुनावण्यात येते. बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ लक्षात घेऊन किमान शिक्षा 7 वरून 10 वर्षं करण्यात आली आहे.
बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास किंवा पीडितेचं शरीर व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजेच निष्क्रिय स्थितीत गेल्यास गुन्हेगाराला 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येते. याव्यतिरिक्त मृत्युदंडाच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे.
16 वर्ष पूर्ण केलेला आरोपी असेल आणि त्याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप असेल तर ज्युवेनाईल जस्टीस बोर्डाकडून त्या व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक परीक्षण करण्यात येतं. त्यानुसार भारतीय दंड संहितेत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
गंभीर घटनांमुळे बदलाची सुरुवात
बलात्कार प्रकरणातील कायद्यांमध्ये झालेल्या बदलांसंदर्भात अॅडव्होकेट रमा सरोदे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना माहिती दिली.
त्यांच्या मते, भारतात मुळात महिलांच्या कायद्यातील बदल आंतरराष्ट्रीय पातळीवरील सीडॉ (CEDAW) म्हणजे ‘कनव्हेंशन ऑन एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन’ स्वीकारल्यानंतर सुरू झाले.
त्यामुळंच कौटुंबीक हिंसाचार किंवा लैंगिक संबंधात महिलेची संमती नसेल तर तो बलात्कार ठरतो, अशा प्रकारचे कायद्यातील महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले, असं त्यांनी सांगितलं. मथुराच्या केसमध्ये त्याचा परिणाम पाहायला मिळाला, असंही सरोदे यांनी सांगितलं.
“भंवरीदेवी प्रकरणानंतर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होतो हे मान्य करावं लागलं. अरुणा शानबाग प्रकरणही कामाच्या ठिकाणी होतं. पण त्यावेळी आपण कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ असं म्हणत नव्हतो.त्यानंतर दिल्लीचं निर्भया प्रकरण झालं. या सगळ्या मोठ्या घटना आहेत. त्यांच्या दरम्यानही अनेक घटना घडल्या. पण अशा मोठ्या घटनांमुळं नवीन कायदे आले किंवा जुन्या कायद्यांत महत्त्वाचे बदल झाले,” असं सरोदे यांनी सांगितलं.
बलात्काराची अधिक व्यापक व्याख्या
दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर वर्मा कमिटी रिपोर्ट आणि 2013 चा क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट आला. त्यामुळं बलात्काराची व्याख्या पूर्णपणे बदलली गेली. यानंतर ही व्याख्या अधिक व्यापक झाली, असं अॅडव्होकेट रमा सरोदे म्हणाल्या.”पूर्वी विनयभंग किंवा बलात्कार अशी कायद्याची दोन टोकं होती. तेव्हा बलात्काराची व्याख्या फार त्रोटक होती. म्हणजे फक्त पीनल व्हजायनल पेनिट्रेशन असेल तरच बलात्कार असं समजलं जात होतं.
“पण पुढं लैंगिक गुन्ह्याचे खूप वेगवेगळे प्रकार आले. ते फक्त विनयभंगात समाविष्ट होऊ शकत नाही. विनयभंगापेक्षा ते खूप गंभीर असतात. त्यामुळं कायद्यातील बदल हे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. बदलेलेल्या इंटरनेटच्या काळात तर ते अधिक गरजेचं झालं आहे,” असंही सरोदे म्हणाल्या.
निर्भयाच्या प्रकरणात तिचा मृत्यू फक्त बलत्कारानं झाला नाही. तर त्यानंतरच्या क्रूर कृत्यामुळं झाला. त्यामुळं या प्रकरणानंतर कायद्यात मोठा बदल झाला.
आपल्याकडं एखादी गंभीर घटना घडली तर त्यात बदललेल्या गुन्ह्याच्या स्वरुपानुसार कायद्यात बदल होतो. पण हे चुकीचं आहे. दरदृष्टी ठेवून काळाजी गरज समजून कायद्यांत बदल होणं गरजेचं आहे, असं सरोदे म्हणाल्या.सामाजिक दृष्टीकोनातून विचार करता कायदे हे समाजातील बदलानुसार प्रवाही असणं गरजेचं आहे. तसं झालं तर समाजाच्या गरजेनुसार त्या कायद्यांचा फायदा होऊ शकेल, असं मत त्यांनी मांडलं.
NCRB चे आकडे चिंताजनक
एनसीआरबी (नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो) च्या 2022 च्या आकड्यांचा विचार करता महिंलाच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
यादरम्यान महिलांच्या विरोधातील वेगवेगळ्या गुन्ह्यांचा आकडा हा 4 लाख 45 हजार 256 एवढा होता. या अहवालानुसार मोठ्या शहरांमध्ये महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
बलात्कारांचा विचार करता 2022 मध्ये भारतात दररोज बलात्काराच्या 87 घटना घडल्याचं समोर आलं होतं. दिल्ली पोलिसांच्या आकडेवारीनुसार शहरात दररोज 5 बलात्काराच्या घटना घडत असल्याचं स्पष्ट झालं.
पण यातील तक्रारीचं प्रमाण नगण्य आहे. शिवाय कायद्यांची यासंदर्भातील न्यायप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळं कठोर कायदे हेच याला आळा घालण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात, असं अभ्यासकांचं मत आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
Published By- Priya Dixit