चंदन चोरट्यांच्या मुसक्या आवळा

शेतकऱ्यांची मागणी : कर्ले येथे चोरीचा प्रकार बेळगाव : शेतीला बळकटी देण्यासाठी चंदन शेती लागवड वाढू लागली आहे. मात्र दुसरीकडे या चंदन शेतीला तस्करीची वाळवी लागत आहे. शुक्रवारी कर्ले येथील शिवारात चोरट्यांनी चंदनाची झाडे तोडून नुकसान केले आहे. अज्ञातांनी तोडलेल्या झाडामुळे शेतकऱ्याला हजारो रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे चंदनचोरांना पायबंद घालावा, अशी मागणीही शेतकऱ्यांतून होऊ […]

चंदन चोरट्यांच्या मुसक्या आवळा

शेतकऱ्यांची मागणी : कर्ले येथे चोरीचा प्रकार
बेळगाव : शेतीला बळकटी देण्यासाठी चंदन शेती लागवड वाढू लागली आहे. मात्र दुसरीकडे या चंदन शेतीला तस्करीची वाळवी लागत आहे. शुक्रवारी कर्ले येथील शिवारात चोरट्यांनी चंदनाची झाडे तोडून नुकसान केले आहे. अज्ञातांनी तोडलेल्या झाडामुळे शेतकऱ्याला हजारो रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे चंदनचोरांना पायबंद घालावा, अशी मागणीही शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे. कर्ले येथील पुंडलिक मुरकुटे यांनी 10-12 वर्षांपूर्वी काजूच्या बागेत चंदनाच्या झाडांची लागवड केली आहे. सध्या या झाडांची वाढ होऊ लागली आहे. मात्र, दरवर्षी चोरट्यांकडून झाडे लक्ष्य केली जात आहेत. चंदनाचा अंश (केंच) मिळविण्याच्या उद्देशाने विनाकारण झाडे चोरट्यांकडून तोडली जातात. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होऊ लागले आहे. रात्रीच्यावेळी या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात आता चंदनचोरीत वाढ होताना दिसत आहे.
जिल्ह्यात 2020 ते 2023 या कालावधीत तब्बल 145 हेक्टर क्षेत्रात चंदनाची लागवड झाली आहे. हळूहळू चंदन शेतीचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. मात्र, चंदनाची झाडे कापून चोरी करण्याच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. त्यामुळे चंदन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे. बाजारात प्रति किलो 6 ते 8 हजार रुपये किलो चंदनाचा दर आहे. त्यामुळे पैशाच्या हव्यासापोटी चंदनाची चोरी वाढू लागली आहे. आधुनिक यंत्राचा वापर करून रात्रीच्या अंधारात चंदनाच्या झाडावर घाव घातला जात आहे. मागील महिन्याभरात 50 हून अधिक ठिकाणी चंदनाची झाडे चोरट्यांनी कापली आहेत. त्याबरोबर शुक्रवारी कर्ले येथील चंदनाच्या झाडाच्या चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे चंदनाच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. बेळगाव, खानापूर यांसह इतर ठिकाणी चंदनाच्या झाडाची लागवड वाढू लागली आहे. शेतकऱ्यांनी बागायतीबरोबर चंदन रोपाच्या लागवडीला पसंती दिली आहे. त्यामुळे चंदनाचे क्षेत्र हळूहळू विस्तारू लागले आहे. शेतकऱ्यांकडून रोपटी लावून संवर्धन केले जात आहे. तर दुसरीकडे चोरटे मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कोवळ्या झाडावर घाव घालू लागले आहेत. त्यामुळे चंदनाची झाडे नष्ट होऊ लागली आहेत. चोरट्यांचा बंदोबस्त करणार का? असा प्रश्नही शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.
रात्रीच्यावेळी चोरट्यांचा उपद्रव
10-12 वर्षापूर्वी काजूच्या बागेत 15 ते 20 चंदनाची झाडे लावली आहेत. मात्र दरवर्षी चोरट्यांकडून झाडे तोडण्याचे प्रकार घडू लागले आहेत. रात्रीच्यावेळी चोरट्यांचा उपद्रव वाढला आहे. विक्रीला आलेली झाडे तोडून नुकसान केले आहे. वनखाते आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे फटका बसला आहे.
– पुंडलिक मुरकुटे (शेतकरी, कर्ले)
चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी उपाययोजना राबवा
अलीकडच्या दोन वर्षांत 145 हेक्टरात चंदनाची लागवड झाली आहे. बाजारात चंदनाच्या लाकडाला मोठी मागणी आहे. शिवाय दरदेखील अधिक मिळतो. त्यामुळे चोरट्यांकडून चंदन लक्ष्य केले जात आहे. पोलिसांनी वनखात्याने चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात.
– महांतेश मुरगोड (सहसंचालक बागायत खाते)