अर्जुनचा सामना अॅरोनियनशी, हरिकृष्णाचा जोस मार्टिनेझशी

वृत्तसंस्था/ मडगांव येथे चालू असलेल्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या प्री-क्वार्टरफायनलमध्ये ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीचा सामना फॉर्ममध्ये असलेल्या आर्मेनियाच्या लेव्हॉन अॅरोनियनशी होईल, तर पी. हरिकृष्णाला मेक्सिकोच्या जायंट-किलर जोस एदुआर्दो मार्टिनेझ अलाकांताराशी लढावे लागेल. टायब्रेकर सामन्यांच्या पहिल्या संचात हंगेरीच्या पीटर लेकोचा 2-0 असा पराभव करणाऱ्या अर्जुनला अॅरोनियनशी लढावे लागेल, ज्याने 16 खेळाडूंच्या फेरीत पोहोचताना उत्तम फॉर्म दाखवला आहे आणि […]

अर्जुनचा सामना अॅरोनियनशी, हरिकृष्णाचा जोस मार्टिनेझशी

वृत्तसंस्था/ मडगांव
येथे चालू असलेल्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या प्री-क्वार्टरफायनलमध्ये ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीचा सामना फॉर्ममध्ये असलेल्या आर्मेनियाच्या लेव्हॉन अॅरोनियनशी होईल, तर पी. हरिकृष्णाला मेक्सिकोच्या जायंट-किलर जोस एदुआर्दो मार्टिनेझ अलाकांताराशी लढावे लागेल.
टायब्रेकर सामन्यांच्या पहिल्या संचात हंगेरीच्या पीटर लेकोचा 2-0 असा पराभव करणाऱ्या अर्जुनला अॅरोनियनशी लढावे लागेल, ज्याने 16 खेळाडूंच्या फेरीत पोहोचताना उत्तम फॉर्म दाखवला आहे आणि अर्जुनला चांगल्या रेटिंगचा फायदा असला, तरी फॉर्मचा विचार करता हा समान स्थिती असलेला सामना दिसतो. हरिकृष्णासाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान जोस मार्टिनेझच्या रूपात आले आहे, ज्याने आतापर्यंत उच्च क्रमांकांवर असलेल्या खेळाडूंना स्पर्धेबाहेर केलेले आहे.
हरिकृष्णाने कबूल केले की, तो कधीही क्लासिकल गेममध्ये मेक्सिकन खेळाडूविरुद्ध खेळलेला नाही. चौथ्या फेरीतील टायब्रेकरमध्ये डॅनिल दुबोव्हने आर. प्रज्ञानंदचेही आव्हान संपुष्टात आणलेले असल्याने आता येथे सन्मानासाठी लढण्याची जबाबदारी हरिकृष्ण आणि अर्जुनवर आहे. या स्पर्धेतील पहिली तीन स्थाने मिळविणाऱ्या खेळाडूंना कँडिडेट स्पर्धेत स्थान मिळणार असून प्रज्ञानंदच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही भारतीयाने अद्याप पुढील कँडिडेट स्पर्धेत स्थान मिळवलेले नाही.
2023 च्या कँडिडेटच्या आवृत्तीत, जी जागतिक विजेता गुकेशने जिंकली होती, एकूण तीन भारतीय होते. प्रज्ञानंद आणि विदित गुजराती गुकेशसोबत स्पर्धेत उतरल्याने इतिहास घडला होता. सध्याच्या विश्वचषकातून बहुतेक मोठे स्टार बाहेर पडले असल्याने अर्जुन आणि चीनचे वेई यी हे 2750 हून अधिक रेटिंग असलेले शेवटचे दोन खेळाडू राहिले आहेत. यामुळे आणखी काही धक्के सहन करावे लागण्याची शक्यता वाटते. मागील फेरीतील टायब्रेकरमध्ये व्हिन्सेंट कीमर आणि मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्ह यांच्या बाहेर पडण्याने चाहत्यांना निश्चितच धक्का बसला होता आणि पुढील फेरीत कोण बाद होईल हे पाहावे लागेल.
वी यीची पुढील फेरीत अमेरिकेच्या सॅम्युअल सेव्हियनशी गाठ पडेल आणि त्यात यीचे पारडे जडे असेल. इतर लक्षवेधी लढतींमध्ये गॅब्रिएल सरगिसियनला उझबेकिस्तानच्या नोदिरबेक याकुबोएव्हचा सामना करावा लागेल, तर दुसरा उझबेक स्टार जावोखिर सिंदारोव्हला जर्मनीच्या फ्रेडरिक स्वानविऊद्ध खेळावे लागेल, ज्याने यापूर्वी गुकेशला पराभूत केले होते.