चक्क पोलिस ठाण्यात खाकीचाच दरोडा ! जप्त दुचाकींची विक्र
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : नागरिकांना बिनधास्त जगता यावे, शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम करणार्या पोलिसांनी चक्क पोलिस ठाण्यात दरोडा टाकल्याचे समोर आले आहे. सांस्कृतिक माहेरघर असलेल्या पुण्यातील लोणी काळभोर पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला आहे. गुन्ह्यातील जप्त केलेल्या दुचाकी थेट परस्पर विकून टाकल्या. याप्रकरणी पुणे शहर पोलिस दलातील 4 पोलिस कर्मचार्यांचे निलंबनही करण्यात आले आहे. दयानंद गायकवाड, संतोष अंदारे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे अशी निलंबित केलेल्या पोलिस कर्मचार्यांची नावे आहेत. त्यांनी चोरट्यांकडून जप्त केलेल्या दुचाकींची न्यायालयाच्या परवानगीशिवाय झिरोच्या मदतीने परस्पर विक्री केल्याचे समोर आले आहे. लोणी काळभोर पोलिसांनी गेल्या वर्षी दुचाकी चोरटा बाळासाहेब घाडगे याला अटक केली होती.
घाडगेकडून दुचाकी जप्त केल्या होत्या. घाडगे हा झिरो असून, तो उरुळी कांचन चौकीला काम करीत होता. पुणे- सोलापूर महामार्गावर असलेल्या उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे उद्घाटन प्रजासत्ताकदिनी करण्यात आले. लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे विभाजन करून उरुळी कांचन पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. पोलिस ठाण्याचे विभाजन केल्यानंतर मुद्देमाल कक्षातील नऊ दुचाकी तेथे नसल्याचे आढळून आले. परिमंडल 5 चे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. चौकशीत लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी गायकवाड, अंदारे, पांढरे, दराडे यांनी मुद्देमाल कक्षातील नऊ दुचाकींची विक्री केल्याचे उघडकीस आले. दुचाकींची विक्री भंगार माल खरेदी करणारा इम—ान शेख याला केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी शेखला अटक केली.
चौकशीत दोषी आढळलेल्या चार पोलिस कर्मचार्यांना पोलिससेवेतून निलंबित करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त राजा यांनी सांगितले. पोलिस ठाण्यातील मुद्देमाल कक्षात चोरट्यांकडून जप्त केलेला मुद्देमाल ठेवण्यात येतो. न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुद्देमालाची विक्री किंवा लिलाव करता येत नाही. जप्त केलेल्या दुचाकींचे मालक न सापडल्यास न्यायालयाच्या आदेशाने दुचाकींची विक्री करण्यात येते.
हेही वाचा :
राज्यात साखर उत्पादन ९५ लाख टनापर्यंतच, हंगाम १०० ते ११४ दिवसांचा
कमी वयातच मुलींना मासिक पाळीचा त्रास, कारणे काय?
Latest Marathi News चक्क पोलिस ठाण्यात खाकीचाच दरोडा ! जप्त दुचाकींची विक्र Brought to You By : Bharat Live News Media.