तडका : नवे यंत्र..!

टेलिफोनचा शोध लागला त्याला आता कित्येक वर्षे होऊन गेली. त्यानंतर आला मोबाईल फोन. मोबाईल फोनमध्ये आला नवीन स्मार्टफोन. आज स्मार्टफोनच्या मदतीने आपण सगळे व्यवहार करू शकतो. शिवाय एकमेकांशी फोनवर संभाषण पण करू शकतो. आता या तंत्रज्ञानाला कृत्रिम बुद्धिमत्तेची साथ मिळाल्यामुळे आणखी एक नवीन यंत्र येऊ घातले आहे, याला म्हणतात स्मार्ट पिन. (Pudhari Editorial)
हा मोबाईल नाहीये, तर काडेपेटीच्या आकाराची स्मार्ट पिन आहे. स्मार्टफोनसारखेच ही काम करते. याला स्क्रीन नाही, म्हणजे ही स्मार्ट पिन त्याऐवजी एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने ही तुमच्या व्हॉईस कमांडवर म्हणजे तुमच्या तोंडी आदेशावर काम करत असते आणि याचा स्क्रीन तुमच्या हातावरच असतो. हातात एखादे हायटेक गॅजेट आल्यासारखे तुम्हाला वाटू शकते. जेम्स बाँडच्या हातामध्ये अनेक यंत्रे असत, तशाच प्रकारची स्मार्ट पिन आज तुमच्या दारात येऊन ठेपलेली आहे. यापुढे मोबाईल मागे पडेल आणि स्मार्ट पिन पुढे येईल. तुम्ही हात पुढे केला की, त्याची लेसर किरणे तुमच्या हातावर तुम्हाला आलेला संदेश किंवा फोन दाखवू लागते, त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे याला स्क्रीन नाही आणि त्याची चिंता करण्याचे कारण नाही. याच माध्यमातून तुम्ही हवी ती गाणी ऐकू शकता. यासाठी तुम्हाला हेडफोन लावण्याची पण गरज नाही. ही स्मार्ट पिन सेन्सरयुक्त आहे. लहान काडेपेटीच्या आकाराच्या स्मार्ट पिनचा उपयोग तुमचा व्यक्तिगत असिस्टंट म्हणूनसुद्धा होऊ शकेल. आपल्याला व्यक्तिगत मदतीसाठी वेगळा माणूस नेमण्याची गरज नाही. त्याऐवजी हे यंत्र पीए म्हणून पण काम करू शकेल. (Pudhari Editorial)
तंत्रज्ञान नेहमी युजर फ्रेंडली लोकांसाठी तयार होत असते. किंबहुना जे तंत्रज्ञान युजर फ्रेंडली नाही, ते कालबाह्य होते. ही स्मार्ट पिन आता तुमच्या आमच्या हातात, खिशात येण्यासाठी सज्ज झालेली आहे. स्मार्टफोन मागे पडून हे काडेपेटीच्या आकाराचे एक यंत्र तुम्हाला सगळ्या जगाशी जोडू शकेल, सगळे व्यवहार करून तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्हाला मदत करू शकेल. विज्ञान शेवटी आपल्याला कुठपर्यंत नेणार, याचा अंदाज बांधणे अशक्य होत आहे. नवनवीन प्रकारची यंत्रे आणि गॅजेट उपलब्ध होणे हा काळाचा महिमा आहे. आता तुम्ही म्हणाल की कशाचा शोध लागायचा बाकी आहे? तर फक्त सध्या एकच शोध बाकी आहे आणि तो म्हणजे माणसाच्या मनात काय विचार सुरू आहेत, हे दाखवणारे यंत्र अद्याप तयार झालेले नाही. तुम्हाला समोरच्या माणसाच्या मनात काय विचार चालू आहेत, हे सांगणारे यंत्र आले म्हणजे मग आपण राम म्हणायला मोकळे होऊ. विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे अनेक शोध लागले आहेत. त्याच्या चांगला की गैरवापर करायचा, हे प्रत्येकाने ठरचण्याची गरज आहे. बर्याचवेळा काही गुन्हेगार तंत्रज्ञानाचा गैरवापर करून लोकांना गंडा घालण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. लोकांनीही सजग राहून नवीन तंत्रज्ञानाचा योग्य आणि फायदेशीर वापर करण्याची गरज आहे. किंबहुना हे प्रत्येकाच्या हातात आहे. अनेकवेळा लोक ऑनलाईन फसवणुकीला बळी पडत असल्याचे दिसते. भविष्यात तंत्रज्ञानाची आणखी क्रांती होण्याची संकेत मिळत असताना त्याचा कसा वापर करायाचा, याचे व्यावाहारिक ज्ञान प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आता आधोरेखित होत आहे.
कलंदर
Latest Marathi News तडका : नवे यंत्र..! Brought to You By : Bharat Live News Media.
