
मुदाळतिट्टा, Bharat Live News Media वृत्तसेवा : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासंदर्भात महासंघाशी त्वरित चर्चा करावी, समस्यांचे निराकरण करावे; अन्यथा बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी कामावर बहिष्कार आंदोलन सुरू करावे लागेल. त्यामुळे होणार्या नुकसानीस शासन जबाबदार असेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन पाठवले आहे.
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा करून 2 मार्च, 2023 रोजी काही मागण्या मान्य करत लेखी आश्वासन दिल्यानंतर महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला होता. त्यानंतर मान्य मागण्यांमधील 1298 वाढीव पदांना मान्यता देण्याऐवजी या पदांवर कार्यरत केवळ 283 शिक्षकांच्या समावेशनाचा आदेश काढला. राज्यात काही शिक्षकांचे समावेशन करण्यात आले; परंतु अनेक शिक्षकांचे समावेशन अजून झालेले नाही. अनेक शिक्षकांबाबत त्रुटीची पूर्तता होऊनही त्यांच्या समावेशनाचे आदेश निघालेले नाहीत, तसेच यापैकी एकाही शिक्षकाचे वेतन सुरू झालेले नाही.
आयटी शिक्षकांना वेतनश्रेणी, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, शाळा संहितेनुसार वर्गातील विद्यार्थी संख्येचे निकष पाळणे इत्यादी मागण्यांचे आदेश निघाले नाहीत. उर्वरित मागण्यांबाबत अद्याप चर्चा केली नाही. महासंघामार्फत अनेकवेळा भेटी, निवेदने देऊनही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे आंदोलने करावी लागली. महासंघ कार्यकारिणीच्या सभेत राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
उत्तरपत्रिका तपासणी बहिष्कार आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. तथापि, राजकीय स्थिती, समस्यांचे निराकरण करण्याची मानसिकता लक्षात घेऊन तूर्त आंदोलन जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे महासंघ बैठकीचे आयोजन करून समस्या सोडवण्याबाबत चर्चा त्वरित करावी; अन्यथा पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशाराही प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिला आहे. यावर अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, सचिव संतोष फाजगे, समन्वयक मुकुंद आंदळकर यांच्या सह्या आहेत.
Latest Marathi News ’मागण्यांची पूर्तता करा, अन्यथा बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर पुन्हा बहिष्कार’ Brought to You By : Bharat Live News Media.
