सात कोटींचे काम सोडून ठेकेदार पळाला
काष्टी : Bharat Live News Media वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी जिल्हा परिषद गटातील अतिशय महत्त्वाचा असणारा काष्टी गणेशा ते अजनुज या सात किलोमीटर रस्ता कामासाठी सात कोटींच्या निविदा निघाल्या. मात्र, सहा महिने झाले तरी रस्त्याचे काम बंद ठेवून, संबंधित ठेकेदार हा काम सोडून पळून गेल्याने संपूर्ण रस्त्याची दुर्दशा झाली आहे. तालुक्यातील काष्टी गणेशा ते अजनुज पुढे तीर्थक्षेत्र असलेल्या सिद्धटेककडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. या सात किलोमीटर रस्त्यासाठी सहा महिन्यांपूर्वी सात कोटी रुपयांची निविदा निघाली. हे काम कर्जत तालुक्यातील एका ठेकेदाराने घेतले. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. पाच महिन्यांत ठेकेदाराने रस्त्यावरील दोन पूल तयार केले. मात्र, हे करताना पक्क्या मुरमाऐवजी शेतातील काळ्या मातीचा भराव टाकला.
त्याचवेळी रस्त्याच्या कडेला राहणार्या जागरूक ग्रामस्थांनी निकृष्ट चाललेले काम बंद पाडत ठेकेदाराला समज दिली. सर्व काम नियमाप्रमाणे न झाल्यास काम होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्यावर ठेकेदार म्हणाला की, सात कोटींच्या कामासाठी मी सत्तर लाख रूपये कमिशन दिले आहे. त्यामुळे मला हे काम करायला परवडत नाही. तेव्हापासून अर्धवट काम सोडून ठेकेदार पळून गेला आहे.
यामुळे गणेशा ते अजनुज रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. सर्व ठिकाणी रस्ता अर्धवट उकरून ठेवल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ऊस वाहतूक करणारी वाहने उलटून शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे रुंदीकरण, अतिक्रमणे, वाढलेली काटेरी झुडपे तशीच आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सर्वांत जास्त निधी येऊनही रस्ता चांगला होत नसेल तर, याची वरिष्ठ अधिकार्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी. संबंधित ठेकेदाराकडून हे काम काढून घेऊन, इतर चांगल्या ठेकेदाराला काम देवून रस्ता पूर्ण करावा.
जूनपासून पावसाळा सुरू झाल्यानंतर काम करता येणार नाही. भिमा नदीकाठचा भाग असल्याने रस्ता तयार करण्यास अडचणी येतील. त्यामुळे लवकर निर्णय घेऊन रस्त्याचे काम सुरू करावे. अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता काष्टी येथे नगर-दौंड रस्त्यावर अजनुज, गणेशा, माळवाडी, गवळवाडी, आनंदवाडी येथील ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारा अजनुजचे माजी उपसरपंच भानुदास कवडे, सेवा संस्थेचे संचालक बापूसाहेब भुजबळ, विशाल गिरमकर, तेजस शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
सत्तर लाख रूपये घेणारा कोण?
अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा अजनुज ते गणेशा रस्ता कामासाठी सुमारे सात कोटींचा निधी मंजूर झाला. परंतु, हे काम देताना संबंधित ठेकेदाराकडून दहा टक्के प्रमाणे सत्तर लाख रूपये कमिशन घेतल्याचे ठेकेदाराने सांगितले. हे कमिशन घेऊन काळ्या यादीत टाकलेल्या या ठेकेदाराला कुणी काम दिले? तो नेता कोण? याची मोठी चर्चा होत आहे.
Latest Marathi News सात कोटींचे काम सोडून ठेकेदार पळाला Brought to You By : Bharat Live News Media.