दौंडला रेल्वे सुरक्षा दलाची शेतकर्यांवर मुजोरी
दौंड : Bharat Live News Media वृत्तसेवा : दौंड रेल्वे सुरक्षा दलातील पोलिस बाहेरगावावरून शहरात येणार्या छोट्या विक्रेत्यांवर मुजोरी करत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी तसेच परप्रांतीय छोटे विक्रेते शहरात आपला माल विक्री करण्याकरिता रस्त्याच्या कडेला आपली दुकाने लावून माल विक्री करतात. काही शेतकरी, विक्रेते रेल्वे हद्दीतील रस्त्यांवरही दुकाने लावतात अशा विक्रेत्यांना रेल्वे सुरक्षा दलातील पोलिस दुकाने लावू नयेत म्हणून मज्जाव करीत आहेत. शेतीमाल विक्रेत्यांनी लावलेली दुकाने त्यांना काढायला लावली जात आहेत. रेल्वे हद्दीत अशा प्रकारची दुकाने लावताना रेल्वे प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यकच आहे. मात्र, याची विक्रेत्यांना माहिती नसल्याने त्यांच्याकडून हे होत नाही, म्हणून त्यांना आपला माल विकू देऊ नये हे अन्यायकारक आहे. यातून काहीतरी मार्ग काढून या विक्रेत्यांना पोलिस प्रशासनाने व दौंडकरांनी मदतीचा हात दिला पाहिजे अशी मागणी शेतकरी, विक्रेत्यांकडून होत आहे.
रेल्वे हद्दीमध्ये दौंडला मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे बोकाळले आहेत. सर्रासपणे गांजा विक्री सुरू आहे. येथील नव्याने झालेल्या कॉर्ड लाईन रेल्वे स्थानक परिसरात गुन्हेगारी फोफावली आहे. रेल्वे कर्मचार्यांना, लोको पायलट, रेल्वे प्रवासी यांना मारहाण करून लुटले गेले असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. चोरट्यांनी एका महिला लोको पायलट वर हल्ला करून तिला लुटण्याचा प्रयत्न केला, तिने आरडाओरडा केल्याने तेथील रिक्षा स्टॅन्ड वरील रिक्षावाल्यांनी तिला वाचविले अशी गंभीर घटनाही या ठिकाणी घडली आहे, मात्र या प्रकरणाची कोठेच तक्रार झाली नसल्याने हे गंभीर प्रकरण दाबले गेले. अशी परिस्थिती रेल्वे हद्दीत असताना त्याकडे गांभीर्याने न पाहता येथील पोलीस प्रशासन मात्र छोट्या विक्रेत्यांवर,शेतकर्यांवर कारवाई करण्यात धन्यता मानत आहेत.
काही दिवसापूर्वी येथील रेल्वे हद्दीत मोठी डिझेल चोरी झाली आहे. या डिझेल चोरी प्रकरणामध्ये दोन सुरक्षा दल कर्मचारी व एक लोहमार्ग पोलीस सहभागी असल्याचे सिद्ध झाल्याने हे प्रकरण चांगलेच गाजले आहे. या प्रकरणात सात ते आठ आरोपींना अटक करण्यात येऊन डिझेल चोरीसाठी वापरलेले काही टॅकरही जप्त करण्यात आले आहेत. असे असताना दौंड रेल्वे सुरक्षा दल यांच्याकडून डिझेल चोरी प्रकरणाची माहिती पत्रकारांना दिली जात नाही.
मध्यंतरी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दौंड रेल्वे स्थानकाला भेट दिली तेव्हा पत्रकारांनी, डिझेल चोरी प्रकरणाची माहिती रेल्वे प्रशासन देत नसल्याची तक्रार केली असता तुम्हाला या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात येईल असे सांगण्यात आले मात्र तरीही अद्याप या डिझेल चोरी प्रकरणाची कोणतीही माहिती पत्रकारांना देण्यात आलेली नाही. रेल्वे सुरक्षा दल डिझेल चोरीची माहिती पत्रकारांना का देत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल पोलिसांच्या या भूमिकेकडे संशयी नजरेने पाहिले जात आहे.
Latest Marathi News दौंडला रेल्वे सुरक्षा दलाची शेतकर्यांवर मुजोरी Brought to You By : Bharat Live News Media.