बनावट कागदपत्राद्वारे शासनाची फसवणूक
इंदापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका होण्यासाठी दहावीचा शाळा सोडल्याचा बनावट दाखला देत शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार इंदापूर पंचायत समितीत उघडकीस आला. याप्रकरणी संबंधित अंगणवाडी मदतनीस महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमा मल्हारी बोरकर उर्फ सीमा बाळासाहेब खामगळ (सध्या रा. वृंदावन अपार्टमेंट, इंदापूर. मूळ रा. वडापुरी, ता. इंदापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या अंगणवाडी मदतनीस महिलेचे नाव आहे. इंदापूर पंचायत समितीतील एकात्मिक बालविकास योजनेचे बाल विकास प्रकल्प अधिकारी संदीप आनंदराव काळे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे.
सीमा बोरकर उर्फ सीमा खामगळ या 19 एप्रिल 1999पासून रामवाडी-वडापुरी येथे अंगणवाडी मदतनीस पदावर काम करीत होत्या. त्यानंतर 27 जानेवारी 2023 रोजी त्यांना अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती मिळाली. दरम्यान बोरकर यांनी इयत्ता दहावीचे गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला हा बनावट दिल्याची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी संदीप काळे यांना मिळाली. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे. बी. गिरासे यांना माहिती देण्यात आली. त्याच्या आदेशाने बोरकर यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.
कागदपत्रांनुसार बोरकर यांनी सादर केलेला दाखला हा मोरोची (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील मोरजाई विद्यालयाचा होता. तेथील मुख्याध्यापकांशी पत्रव्यवहार केला असता त्यांनी बोरकर यांच्या नावाने दाखला वितरित केलेला नाही असे कळविले. त्यानंतर 20 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाच्या विभागीय सचिवांनाही बोरकर यांनी सादर केलेल्या दहावीच्या मार्च 1995 परिक्षेच्या गुणपत्रकाची तपासणी केली. मात्र त्यावरील बैठक क्रमांक हा अमित विश्वनाथ धाबू याच्या नावे असल्याचे निष्पन्न झाले. बोरकर यांची कोणत्याही दप्तरी नोंद मिळून येत नाही, असा लेखी अहवाल मिळाला. त्यामुळे बोरकर यांनी इयत्ता दहावीचे गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला दिल्याचे निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. इंदापूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Latest Marathi News बनावट कागदपत्राद्वारे शासनाची फसवणूक Brought to You By : Bharat Live News Media.