पाच इंच लांबीची इशारतीची तोफ; ब्रांझ धातूपासून घडवणूक

सातारा :  वाई येथे राहणारे इतिहास अभ्यासक प्रसाद बनकर यांनी शिवकालीन शस्त्रास्त्रांचा संग्रह करण्याचा छंद जोपासला असून त्यांच्या शस्त्र संग्रहात नुकतीच एक इशारतीची तोफ दाखल झाली आहे. लांबी पाच इंच, अत्यंत सुंदर नक्षीकाम व ब्रांझ धातूपासून घडवण्यात आलेली ही तोफ 18 व्या शतकातील असल्याचे समोर आले आहे. प्रसाद बनकर यांनी गेल्या 22 वर्षांपासून शस्त्रास्त्रांचा संग्रह … The post पाच इंच लांबीची इशारतीची तोफ; ब्रांझ धातूपासून घडवणूक appeared first on पुढारी.

पाच इंच लांबीची इशारतीची तोफ; ब्रांझ धातूपासून घडवणूक

विशाल गुजर

सातारा :  वाई येथे राहणारे इतिहास अभ्यासक प्रसाद बनकर यांनी शिवकालीन शस्त्रास्त्रांचा संग्रह करण्याचा छंद जोपासला असून त्यांच्या शस्त्र संग्रहात नुकतीच एक इशारतीची तोफ दाखल झाली आहे. लांबी पाच इंच, अत्यंत सुंदर नक्षीकाम व ब्रांझ धातूपासून घडवण्यात आलेली ही तोफ 18 व्या शतकातील असल्याचे समोर आले आहे.
प्रसाद बनकर यांनी गेल्या 22 वर्षांपासून शस्त्रास्त्रांचा संग्रह व त्यांचे संवर्धन करण्याचा छंद जोपासला आहे. त्यांच्या संग्रहात शिवकालीन तलवार, भाले, बरचे, वाघनखे, बिचवा, दांडपट्टे , मराठा धोप तलवार, चिलानम, ढाल व ढालीचे विविध प्रकार, ब्रिटिशकालीन तलवारी, बंदुका, बारुददान यांसह 14 व्या आणि 15 व्या शतकातील हजारो शस्त्रे आहेत. विविध धातूपासून बनवण्यात आलेल्या देवी देवतांच्या मूर्ती, दुर्मीळ दिवे, 12 हजारांपेक्षा जास्त जुन्या नाण्यांचा संग्रह देखील त्यांनी केला आहे. त्यांच्या संग्रहात 10 ईशारतीच्या तोफा असून नुकतीच एक तोफ त्यांच्या संग्रहात दाखल झाली आहे. कोल्हापूर येथे कामानिमित्त गेले असता त्यांना एका कुटुंबाकडे ही तोफ आढळून आली. या तोफेचे महत्व जेव्हा त्या कुटुंबीयांना सांगण्यात आले तेव्हा त्यांनी ही तोफ जतनीकरणासाठी बनकर यांना देऊ केली. केवळ 5 इंच लांबीची ही तोफ त्यांच्या संग्रहातील सर्वांत लहान तोफ आहे.
तीन शतके पाहायला मिळाल्या तोफा…
इशारतीच्या तोफा 16 व्या शतकापासून 19 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत पहायला मिळतात. या तोफा त्या काळातील राजघराणे, सरदार घराणे किंवा मोठ्या व्यक्तींच्या वाड्यात, देवघराबाहेर ठेवल्या जात असत. जत्रेच्या वेळी घरातील देव पालखीमध्ये बसवून पालखी बाहेर येताना अथवा देव वाड्याबाहेर पडले आहेत, याची इशारत देण्यासाठी या तोफेमध्ये गुलाल भरुन व दारुगोळा भरुन बत्ती दिली जायची. म्हणूनच अशा तोफांना ‘इशारतीच्या तोफा’ हे नाव दिले गेले असावे, असा कयास इतिहास अभ्यासकांकडून बांधला जात आहे.

इशारतीच्या तोफांच्या नळकांड्याची (बॅरल) लांबी 5 इंचापासून 24 इंचापर्यंत पाहण्यास मिळते. या प्रकारच्या तोफांवर सुंदर नक्षीकामदेखील आढळते. अशा तोफा पोलाद, पितळ, ब्रांझ किंवा पंचधातूपासून बनवण्यात येतात. गेली वीस वर्षे या शस्त्रांच्या माध्यमातून छत्रपती शिवराय, विविध सरदार तसेच आपल्या पूर्वजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपुढे मांडण्याचा प्रयत्न मी करत आहे.
-प्रसाद बनकर, आजीव सदस्य, भारत इतिहास संशोधक मंडळ

Latest Marathi News पाच इंच लांबीची इशारतीची तोफ; ब्रांझ धातूपासून घडवणूक Brought to You By : Bharat Live News Media.