सौरमालिकेबाहेरील ग्रहावर आढळले पाण्याचे रेणू
वॉशिंग्टन : हबल स्पेस टेलिस्कोपच्या साहाय्याने खगोलशास्त्रज्ञांनी सौरमालिकेबाहेरील एका ग्रहावर पाण्याचे रेणू असल्याचे शोधून काढले आहे. हा बाह्यग्रह पृथ्वीपासून 97 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. या ग्रहाचे नाव ‘जीजे 9827 डी’ असे आहे. या बाह्यग्रहाचा व्यास पृथ्वीच्या दुप्पट आहे. मात्र, तरीही ज्या बाह्यग्रहांच्या वातावरणात पाण्याची बाष्प आढळली, अशांमध्ये तो सर्वात लहान आकाराचा आहे. अर्थात, या ग्रहाच्या वातावरणात पाण्याचा अंश असला, तरी प्रत्यक्ष ग्रहावरील मोठ्या तापमानामुळे त्यावर जीवसृष्टीची शक्यता नाही.
या ग्रहावरील पाणी वाफ बनून वातावरणात जाते. या ग्रहाच्या वातावरणाची नेमकी स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न संशोधक करीत आहेत. सौरमंडळाबाहेरील ग्रहांच्या उत्पत्तीवरही या संशोधनामुळे नवा प्रकाश पडेल. याबाबतच्या संशोधनाची माहिती लॉरा क्रेडबर्ग यांनी दिली आहे. इतक्या छोट्या बाह्यग्रहावर पाण्याचा छडा लागणे हा एक महत्त्वाचा शोध असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘एस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.
या ग्रहाचे तापमान 437 अंश सेल्सिअस आहे. त्यामुळे हा ग्रह वाफेने भरलेला आहे. माँट्रियल युनिव्हर्सिटीच्या ट्रॉटियर इन्स्टिट्यूट फॉर रिसर्चचे प्राध्यापक आणि संशोधनाचे सहलेखक ब्योर्न बेनेके यांनी सांगितले की, अन्य तार्यांभोवतीही वातावरणात पाणी असलेले ग्रह असतात, हे यावरून पुन्हा एकदा दिसून आले. या ग्रहाच्या तार्याचे नाव ‘जीजे 9827’ असे आहे. या तार्यानेच ग्रहाचे मूळ हायड्रोजन आणि हेलियमचे वातावरण नष्ट केले आहे.
Latest Marathi News सौरमालिकेबाहेरील ग्रहावर आढळले पाण्याचे रेणू Brought to You By : Bharat Live News Media.