लवंगी मिरची : उत्साही लोकांचा देश
आपल्या देशामध्ये वर्षातील कोणत्याही महिन्यात पहा, कोणता ना कोणता उत्सव साजरा केला जातो. पावसाळ्याच्या काळामध्ये श्रावण महिना येतो. श्रावण महिन्यामध्ये भाविकांचा शंकर भक्तीचा उत्साह ओसंडून वाहत असतो. काही लोक कावड घेऊन महादेवाला अभिषेक घालण्याच्या मोहिमांमध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी होत असतात. एवढे झाले की, लगेच गणपती उत्सव येतो. गणेशोत्सव म्हणजे उत्साहाची पर्वणीच! ती गणपतीची आरास, ते डीजे, ते तालावर नाचणारे युवक-युवती यांच्यामध्ये चैतन्य असते. याला कारण म्हणजे यांच्यामध्ये असणारा उत्साह आहे. आपला देश आणि विशेषत: महाराष्ट्र, अत्यंत उत्साही वीरांचा प्रांत आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. त्यानंतर येते नवरात्र. नवरात्र सणामध्ये दुर्गा देवीची प्रतिष्ठापना आणि त्यासोबत असंख्य कार्यक्रम घेतले जातात. प्रत्येक कार्यक्रमाला लोकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो.
यावर्षी दिवाळीच्या सोबतच विश्वचषक क्रिकेट स्पर्धाही आली आणि दुप्पट उत्साहाने भारतीय लोकांनी दिवाळी आणि वर्ल्डकपचा आनंद लुटला. अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमधील सर्व लॉज, विश्रामगृहे भरून गेली होती. एरवी ज्या हॉटेलचे भाडे 2 हजार असते, ते 14 हजारपर्यंत गेले होते आणि पंचतारांकित हॉटेलचे भाडे 15 लाखांपर्यंत गेले होते.
दिवाळीच्या प्रत्येक दिवशी अक्षरशः करोडो रुपयांच्या फटाक्यांचा आवाज करत अंगी असलेल्या उत्साहाचे प्रकटीकरण होत असते. कितीही अडचणी असतील, जगण्याचा संघर्ष असेल, दैनंदिन उपजीविकेसाठी काम करायला लागत असेल, तरीही भारतीय लोकांचा उत्साह काही कमी होत नाही. भारतामधील लोक अत्यंत आनंदी आहेत आणि या आनंदी प्रवृत्तीचा आणि उपलब्ध असलेल्या पैशाचा काही संबंध नाही हे विशेष. म्हणजे खिशात पैसा असतो किंवा नसतो; पण एखादी लग्नाची मिरवणूक निघाली तरी भान हरपून नाचणारे पन्नास शंभर टाळकी तर असतातच. मग या लोकांचा उत्साह हॅप्पीनेस इंडेक्स वाढवत नाही काय?
मेळावे आणि मिरवणुका या वर्षभर सुरू असतात. तुम्हाला असे वाटेल की, आम्ही राजकीय पक्षांच्या मिरवणुका आणि मेळावे याबद्दल बोलत आहोत. अजिबात तसे नाही; पण तिथेपण लोकांचा उत्साह असतोच. येऊ घातलेल्या महानगरपालिका आणि विधानसभा, लोकसभा निवडणुकांसाठी आतापासूनच लोक उत्साहाने चर्चा करत आहेत. टीव्ही चॅनेल्स पाहिले, तर लोक हिरिरीने राजकीय चर्चांमध्ये भाग घेतात असतात आणि आपला स्वत:च्या अभ्यासाचा प्रत्यय देत आपले म्हणणे मांडत असतात. ‘अभ्यासोनी प्रकटावे’ हे तंतोतंत पाळणारा देश म्हणजे भारत देश आहे, असे तुम्हाला टीव्हीवरील बातम्या पाहून लक्षात येईल. समजा, मीडिया एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेत असेल, तर त्याच्याभोवती पाच-पन्नास व्यक्ती तो काय बोलत आहे, हे अत्यंत उत्साहाने ऐकत असतात. एवढेच काय, रोडच्या बाजूला एखाद्या जेसीबीच्या मदतीने खोदकाम सुरू असेल तर त्याच्याभोवतीसुद्धा पाच-पन्नास टाळकी उभी असतात आणि अत्यंत उत्साहाने काय चालले आहे ते पाहत असतात. यावरून भारताचा हॅप्पीनेस इंडेक्स खूप वर आहे, असे तुमच्या लक्षात येईल.
जे काय करायचे ते उत्साहाने करायचे, ही भारतीय लोकांची प्रवृत्ती आहे. ते मतदानही तशाच उत्साहाने करतील आणि धार्मिक उत्सवसुद्धा तेवढ्याच उत्साहाने साजरे करतील. हा उत्साह येतो कुठून, याचा मात्र अद्याप शोध लागलेला नाही आहे. धार्मिक सण साजरे करण्यामध्ये आर्थिक दरी अजिबात नसते. एकाच मिरवणकीमध्ये श्रीमंत आणि गरीब धुंद होऊ नाचत असतात.
The post लवंगी मिरची : उत्साही लोकांचा देश appeared first on पुढारी.
आपल्या देशामध्ये वर्षातील कोणत्याही महिन्यात पहा, कोणता ना कोणता उत्सव साजरा केला जातो. पावसाळ्याच्या काळामध्ये श्रावण महिना येतो. श्रावण महिन्यामध्ये भाविकांचा शंकर भक्तीचा उत्साह ओसंडून वाहत असतो. काही लोक कावड घेऊन महादेवाला अभिषेक घालण्याच्या मोहिमांमध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी होत असतात. एवढे झाले की, लगेच गणपती उत्सव येतो. गणेशोत्सव म्हणजे उत्साहाची पर्वणीच! ती गणपतीची आरास, ते …
The post लवंगी मिरची : उत्साही लोकांचा देश appeared first on पुढारी.