व्हायरल पोस्टचा निषेध कर्जत शहरात कडकडीत बंद

कर्जत : Bharat Live News Media वृत्तसेवा : अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण कार्यक्रमाबाबत सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल केली. त्याच्या निषेधार्थ कर्जतमध्ये गुरुवारी (दि.25) कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी चौघा जणांवर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अमर धनराज बेद्रे (रा. सुपे, ता.कर्जत) व प्रवीण महादेव पोटे (रा.शिंदा, ता. कर्जत) या दोघांनी कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुलतान झारेकरी व कलीम झारेकरी, मोहिद झारेकरी व अकबर झारेकारी (सर्व रा.झारेकरी गल्ली, कर्जत) यांनी सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावून, समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने बाबरी मस्जिदचा फोटो व त्याखाली इंग्रजीमध्ये वादग्रस्त मजकूर लिहून ही पोस्ट प्रसारित केली. या प्रकरणी पोलिसांनी या चौघांविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
ही पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाल्याने त्याचे तीव्र पडसाद कर्जतमध्ये उमटले. अखंड हिंदू समाजाच्या वतीने याचा निषेध करणारे निवेदन तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले. तसेच, या प्रकाराच्या निषेधार्थ गुरूवारी कर्जत शहरात दुपारी बारा वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व दुकाने, सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून व्यापारी बांधवांनी पाठिंबा दिला होता. शहराते सकाळपासून तणावाचे वातावरण होते. सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Latest Marathi News व्हायरल पोस्टचा निषेध कर्जत शहरात कडकडीत बंद Brought to You By : Bharat Live News Media.
