खोल समुद्रातील सर्वात मोठ्या प्रवाळ रचनेचा शोध
वॉशिंग्टन : जगातील सर्वात मोठी प्रवाळरचना ‘द ग्रेट बॅरिअर रीफ’ ही ऑस्ट्रेलियाजवळ समुद्रात पाहायला मिळते. आता संशोधकांनी अतिशय खोल समुद्रात असणारी सर्वात मोठी प्रवाळरचना शोधून काढली आहे. अमेरिकेच्या आग्नेयेकडील किनारपट्टीलगत ही प्रवाळरचना आहे. समुद्रतळाच्या एका नव्या नकाशातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
या अंधार्या भागातील, भयावह वाटणार्या स्थितीतील प्रवाळरचनेत सागरी जलचरांचे अनेक प्रकारचे वैविध्य दिसून येऊ शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे. ‘जिओमॅटिक्स’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. या संशोधनासाठी 31 मल्टिबीम सोनार मॅपिंग सर्व्हेज आणि 23 सबमर्सिबल डाईव्जमधून मिळालेल्या डेटाचा वापर करण्यात आला.
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना आणि फ्लोरिडादरम्यानच्या किनार्यापासून 160 किलोमीटरवर समुद्रात खोलवर असलेल्या ‘ब्लॅक प्लॅटेऊ’वर ही प्रवाळरचना आहे. त्यामध्ये यापूर्वी अज्ञात असणार्या अनेक प्रवाळ टेकड्या दिसून आल्या आहेत. त्यांना ‘डीप सी कोरल्स’ किंवा ‘कोल्ड वॉटर कोरल्स’ही म्हटले जाते. समुद्राच्या पृष्ठभागापासून 1640 ते 3280 फूट खोलीवर ही प्रवाळरचना 2.6 दशलक्ष हेक्टर जागेत पसरलेली आहे. त्यापैकी सर्वात मोठी प्रवाळरचना 254 किलोमीटर लांब आणि 42 किलोमीटर रुंदीची आहे.
Latest Marathi News खोल समुद्रातील सर्वात मोठ्या प्रवाळ रचनेचा शोध Brought to You By : Bharat Live News Media.