कॅथलॅब सिस्टीमसाठी सीपीआरला 17 कोटी मंजूर
मुंबई/कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिपत्याखाली येत असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अद्ययावत कॅथलॅब सिस्टीम आणि 2-डी इको मशिनसाठी 17 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दोन वर्षांपासून यासाठी प्रयत्न सुरू होते.
कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयावर रुग्णसेवेचा मोठा ताण आहे. येथे सर्व प्रकारच्या ओपीडीसाठी दररोज सुमारे 1,700 ते 1,800 रुग्ण येत असतात. कार्डिओलॉजी विभागाकडेदेखील रुग्णांचा ओघ मोठा आहे. सध्या सीपीआरकडे असणारी कॅथलॅब मशिन ही 10 वर्षांपूर्वीची असून, तिची मुदत ऑक्टोबर 2024 मध्ये संपणार आहे. त्यामुळे वर्षभरापासून कार्डिओलॉजी विभागाने या मशिनरीसाठी निधी मिळावा, यासाठी प्रयत्न केले होते. वैद्यकीय शिक्षण विभागासोबत पत्रव्यवहार केला होता. दरम्यान, वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्रिपद हसन मुश्रीफ यांना मिळताच या कामाला गती आली. सीपीआरमध्ये झालेल्या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत कॅथलॅबसाठी निधी देऊ, असे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर हा निधी मंजूर झाला आहे.
कान, नाक घसा विभागासाठी तीन कोटी
सीपीआरमधील कान, नाक, घसाशास्त्र व शल्यचिकित्सा विभागासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यामुळे या विभागात नव्या सुविधा आणि साधने उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सीपीआरमध्ये मिळणार्या मूलभूत सोयीसुविधांमध्ये वाढ होणार आहे.
Latest Marathi News कॅथलॅब सिस्टीमसाठी सीपीआरला 17 कोटी मंजूर Brought to You By : Bharat Live News Media.