राष्ट्रवादीत गट-तट नाहीत; संपूर्ण पक्ष एकच : तटकरे
मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य प्रतिनिधींनी 2015 साली प्रदेशाध्यक्ष म्हणून मला निवडून दिले. मात्र, त्यानंतर पक्षांतर्गत निवडणुकाच झाल्या नसल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणीदरम्यान केला. पक्षात कोणतेच गट-तट नसून, एकच राष्ट्रवादी पक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रता याचिकांवर सुनावणी सुरू आहे. शरद पवार गटाच्या आमदार जितेंद्र आव्हाड, हेमंत टकले, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उलटतपासणीनंतर गुरुवारी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांची उलटतपासणी घेण्यात आली. यावेळी शरद पवार गटाचे वकील रेहान जगतियानी यांनी उलटतपासणीत तटकरे यांना अनेक प्रश्न विचारले. यात प्रामुख्याने 21 जून रोजी झालेली राष्ट्रवादीची बैठक आणि अजित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आलेली प्रक्रिया यावर बोट ठेवण्यात आले.
21 जून रोजी झालेल्या बैठकीत शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष होते. अजित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष नेमके कधी करण्याचे ठरले? तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी कधी निवड करण्यात आली? कोणत्या पदाधिकार्यांनी त्यांना पाठिंबा दिला, अशा प्रश्नांचा मारा वकिलांनी केला. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात 14 मंत्री होते व त्यापैकी 9 मंत्री अजित पवार गटाचे होते हे माहीत होते का, असाही सवाल करण्यात आला. त्यावर राष्ट्रवादीत कोणतेही गट-तट नाहीत. अजित पवार यांची बहुमताने निवड झाली होती. 2015 साली आपण प्रदेशाध्यक्षपदी निवडून आलो. त्यानंतर निवडणूक झाली नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
पक्षनेतृत्वाच्या परवानगीनेच फडणवीस-पवारांचा शपथविधी
2019 मध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यासंदर्भात शरद पवार गटाच्या वकिलांनी भाजप-राष्ट्रवादीची युती झाली होती काय, या युतीला पक्षनेतृत्व आणि इतर पदाधिकार्यांचा पाठिंबा होता का, असे प्रश्न विचारले. त्यावर, फडणवीसांसोबतच्या शपथविधीला पक्षनेतृत्वाचा पाठिंबा होता, असे तटकरे म्हणाले. मात्र, नेतृत्वाने या शपथविधीला कशी मान्यता दिली याबद्दल काहीही सांगता येणार नाही, असे उत्तर त्यांनी दिले.
शरद पवारांची सुनावणीला हजेरी
राष्ट्रवादीच्या सुनावणीवेळी पहिल्यांदाच ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे, रोहित पवार हेही उपस्थित होते. त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती पवार याही उपस्थित होत्या.
Latest Marathi News राष्ट्रवादीत गट-तट नाहीत; संपूर्ण पक्ष एकच : तटकरे Brought to You By : Bharat Live News Media.