अंगणवाडी कर्मचार्यांना पेन्शन
मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचार्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केल्यामुळे 4 डिसेंबर 2023 पासून सुरू असलेला अंगणवाडी कर्मचार्यांचा संप गुरुवारी संध्याकाळी मागे घेण्यात आला. पेन्शनबाबतचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळात मंजुरीसाठी पाठवला जाईल, अशी ग्वाही सरकारने दिली. मात्र, वेतनश्रेणी व संपकाळातील मानधनाबाबतचा प्रश्न या बैठकीत सुटू शकला नाही.
अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांची बैठक महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव आणि महिला बालविकास आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासोबत झाली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅच्युईटी तसेच कर्मचार्यांना मोबाईल देण्याचे मान्य करण्यात आले.
मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविकापद देण्याचे आदेश काढले जाणार असून, संपकाळात कामावरून कमी केलेल्या कर्मचार्यांना कामावर घेण्याचे मान्य करण्यात आले आहे. कर्मचार्यांवर कारवाई करण्याबाबत दिलेले आदेशही मागे घेण्यात आले आहेत. कोरोना काळातील राहिलेल्या दिवाळी व उन्हाळी सुट्टीमध्ये रजा समायोजित करण्याविषयी सकारात्मक विचार केला जाईल, असे बैठकीत ठरले.
दहावी पास मदतनिसांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. महिला बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी 5 डिसेंबर 2023 रोजी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आशा स्वयंसेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर अंगणवाडी कर्मचार्यांच्या मानधनवाढीचा विषय घेतला जाणार आहे.
Latest Marathi News अंगणवाडी कर्मचार्यांना पेन्शन Brought to You By : Bharat Live News Media.