‘मविआ’च्या मुंबईतील चार जागा ठाकरे गटाला
मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : महाविकास आघाडीच्या गुरुवारी झालेल्या जागावाटपाच्या बैठकीत मुंबईतील सहापैकी चार ठाकरे गट, तर दोन जागा काँग्रेस लढविणार असल्याचे ठरले आहे. दरम्यान, राज्यातील लोकसभेच्या काही जागांवर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेस पक्ष आग्रही आहे. (Lok Sabha Election 2024)
30 जानेवारीच्या बैठकीत त्यावर चर्चा होईल. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील सहापैकी एकही जागा शरद पवार गटाला मिळालेली नाही. त्यांनी ईशान्य मुंबईची जागा मागितली होती. परंतु, ती न मिळाल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजीचा सूर या बैठकीत काढला. याबरोबरच राज्यातील काही जागांवर अजूनही मतभेद आहेत. 30 जानेवारीच्या बैठकीत यावर पुन्हा एकदा बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. (Lok Sabha Election 2024)
जागावाटपाबाबत दिल्लीत महाविकास आघाडीच्या घटकपक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक गेल्या आठवड्यात झाली होती. त्यात काँग्रेस आणि ठाकरे गटाला प्रत्येकी 20, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला आठ जागा देण्याचे प्राथमिक स्तरावर ठरले होते. मात्र, या बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा झाली नव्हती. याबाबतचे अधिकार राज्यातील नेत्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील ट्रायडंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये आघाडीच्या घटकपक्षांची बैठक झाली.
या बैठकीला काँग्रेसकडून अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते शिवसेनेकडून संजय राऊत, विनायक राऊत व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते.
मुंबईत काँग्रेसला दोन जागा
बैठकीच्या सुरुवातीला राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. सद्यस्थितीत कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाची ताकद आहे, त्यावर चर्चा करण्यात आली. काँग्रेसने 23 मतदारसंघांवर दावा केला. ठाकरे गटाने 24 मतदारसंघांवर दावा केला आहे. शरद पवार गटाने 14 मतदारसंघांवर आपला दावा ठोकला आहे.
मुंबईत ठाकरे गटाने पाच जागांवर दावा केला होता. त्यातील चार जागा कोणत्याही परिस्थितीत मिळाल्याच पाहिजेत, अशी आग्रही भूमिका त्यांनी बैठकीत घेतली; तर काँग्रेसनेही चार मतदारसंघांवर दावा केला. परंतु, चर्चेअंती दोन जागांवर काँग्रेसने तडजोड केली.
कोल्हापूरसाठी काँग्रेस आग्रही
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरच्या जागेसाठी काँग्रेसने हट्ट धरला आहे. सांगली, सोलापूर या जागाही काँग्रेसने मागितल्या आहेत. पवार गट मावळ, शिरूर, सातारा आणि बारामती या जागा लढविणार आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या दोन जागा ठाकरे गटाला देण्याचे बैठकीत मान्य करण्यात आले आहे.
विदर्भात रामटेक, अमरावतीवर काँग्रेसचा दावा
काँग्रेसने विदर्भात सर्वाधिक जागांची मागणी केली आहे. यातील रामटेक, अमरावती या मतदारसंघांचा समावेश आहे. मात्र, ठाकरे गटाने प्राथमिक बैठकीत तरी या जागा देण्यास विरोध दर्शविला आहे. गोंदिया आणि अमरावती हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने मागितले आहेत. मराठवाड्यात हिंगोली, औरंगाबाद या जागांवर मतभेद आहेत. उत्तर महाराष्ट्रात नाशिकच्या जागेसाठी ठाकरे गटाने हट्ट धरला आहे. कारण, धुळे नंदुरबार या दोन जागा काँग्रेसने मागितल्या आहेत. रावेरची जागा शरद पवार गटाने मागितली आहे. (Lok Sabha Election 2024)
काँग्रेसचे निर्णय पटोलेंऐवजी थोरात, चव्हाण घेणार
‘मविआ’च्या बैठकीकडे निमंत्रण असूनही वंचित आघाडीने पाठ फिरविली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना याबाबात निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, असे म्हणत त्यांच्यावर कठोर टीका करणारे एक पत्रच आंबेडकर यांनी गुरुवारी दुपारी जारी केले. यानंतर बैठक सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आंबेडकर आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांना कॉन्फरन्स कॉलमध्ये जोडून त्यांचे बोलणे करून दिले. पटोले यांना अधिकार नसला, तरी बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण निर्णय घेऊ शकतात, असे चेन्नीथला यांनी सांगितले. त्यामुळे आंबेडकरांनी 30 जानेवारीच्या बैठकीस हजर राहण्याचे मान्य केले.
Latest Marathi News ‘मविआ’च्या मुंबईतील चार जागा ठाकरे गटाला Brought to You By : Bharat Live News Media.