कोणाच्या पोटावर पाय देऊन तीर्थक्षेत्र विकास करणार नाही : हसन मुश्रीफ
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : कोल्हापूर शहराच्या विकासाच्या द़ृष्टीने श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा महत्त्वाचा आहे. मात्र कोणाच्याही पोटावर पाय देऊन हा आराखडा राबविणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. (Hasan Mushrif)
श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये बाधित होणार्या व्यापारी रहिवासी यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात ही बैठक झाली. (Hasan Mushrif)
मुश्रीफ म्हणाले, श्री अंबाबाई दर्शनासाठी पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत सुविधा निर्माण केल्या पाहिजे. त्यासाठी हा आराखडा महत्त्वाचा आहे. असे असले तरी यामध्ये बाधित होणारे व्यापारी, स्थानिक रहिवासी यांना सोबत घेऊनच पुढे जावे लागेल. येथील रहिवासी व्यापारी यांचे समाधान करूनच पुढील निर्णय घेतला जाईल. सध्याच्या प्रस्तावित आराखड्याबाबत व्यापार्यांचा आक्षेप आहे. त्यामुळे जास्तीत जास्त व्यापार्यांच्या व्यवसायास आराखड्यात स्थान देण्यासाठी कपिलतीर्थ मार्केटचा या आराखड्यात समावेश करता येतो याची चाचपणी केली जाईल. याबरोबरच या पसिरातील काही स्थानिक मंडळी जागा देण्यास तयार असल्यास त्याचाही यामध्ये समावेश करून अधिकाधिक व्यापार्यांना याच परिसरात कसे सामावून घेता येईल, याचा विचार केला जाईल. कुणावरही अन्याय होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली जाईल. मात्र सर्वांचे शंभर टक्के समाधान होणार नाही. त्यामुळे शहर विकासासाठी या मंडळींनी थोडा त्याग आणि त्रास सहन करावा, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या निमित्ताने या मागणीस मूर्त स्वरूप येत आहे. स्थानिक रहिवासी व्यापारी यांच्या मदतीशिवाय हा प्रकल्प पुढे नेऊ शकत नाही. कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन नियोजन सुरू आहे.
प्रा. जयंत पाटील म्हणाले, या आराखड्यासाठी आतापर्यंत चर्चा झाली. मात्र आवश्यक निधी मिळाला नाही. अधिकार्यांकडून या आराखड्यास चालना मिळाली आहे. (Hasan Mushrif)
माजी नगरसेवक अजित ठाणेकर म्हणाले, या परिसरातील मंदीराशी संबंधीत स्थानिक रहिवाशांचे याच परिसरात पुनर्वसन करावे. प्रस्तावात 160 दुकाने असून प्रत्यक्षात मात्र 300 दुकाने आहेत. तर 3000 कुटुुंबे आहेत.
माजी नगरसेवक किरण नकाते जयंत गोयानी, विक्रम जरग यांनीही भूमिका मांडली. आर्किटेक्ट सुनील पाटील यांनी आराखड्याचे सादरीकरण करून कशा पद्धतीने नियोजन सुरू आहे, याची स्लाईड शोद्वारे माहिती दिली.
बैठकीस खा. धनंजय महाडिक, आ. राजेश पाटील, महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी, आदिल फरास उपस्थित होते. व्यापारी व स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Latest Marathi News कोणाच्या पोटावर पाय देऊन तीर्थक्षेत्र विकास करणार नाही : हसन मुश्रीफ Brought to You By : Bharat Live News Media.