माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराच्या खालोखाल प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार मानले जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा झाली. निवडणूक वर्षात जाहीर झालेल्या या पुरस्कारांच्या यादीमध्ये प्रामुख्याने दक्षिण भारतातील नामवंतांचा ठसा पद्मविभूषण पुरस्कारांवर उमटला आहे. माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, सुलभ स्वच्छतागृहांचे प्रणेते बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर), तेलगु अभिनेते चिरंजीवी आणि प्रख्यात सिने अभिनेत्री वैजयंतीमाला बाली, प्रसिद्ध नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांना यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत.
कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक सेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकीय सेवा, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार जाहीर करण्यात आले. यंदा मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. यंदा १३२ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. पाच जणांना पद्मविभूषण, सतरा जणांना पद्मभूषण आणि ११० जणांना पद्मश्री सन्मान जाहीर झाले. ९ जणांना मरणोत्तर हे पुरस्कार प्रदान केले जातील. काहींना संयुक्तपणे हे पुरस्कार देण्यात आले आहेत. पद्म पुरस्कारांमध्ये एकूण ११ पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाले.
पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, होमरूसजी एन कामा (साहित्य शिक्षण पत्रकारिता), अश्विन बालचंद मेहता (औषधनिर्मिती), प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त उर्फ दत्तात्रय अंबादास मायाळू (कला) , प्रसिद्ध संगीतकार प्यारेलाल शर्मा, पत्रकार कुंदन व्यास या महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्वांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश केरळच्या एम फातिमा बिवी, सिने अभिनेता मिथुन चक्रवर्ती, कर्नाटक मधील उद्योजक सिताराम जिंदाल, तैवान चे उद्योग क्षेत्रातील व्यक्तिमत्व योंउंग लिऊ , पश्चिम बंगाल चे सत्यब्रत मुखर्जी (मरणोत्तर), गुजरातचे तेजस मधुसूदन पटेल केरळ मधील पोरांचेली राजगोपाल, लडाखमधील अध्यात्मिक नेते तोगदान रिंपोचे, बिहारचे चंद्रेश्वर प्रसाद ठाकूर, प्रसिद्ध गायिका उषा उत्थुप, तमिळनाडूमधील दिवंगत अभिनेते विजयकांत (मरणोत्तर) यांचाही पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.
देशभरातील ११० मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील मल्लखांब प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे, औषध निर्मिती क्षेत्रातील मनोहर कृष्णा डोळे, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील जहीर आय काझी, औषध निर्माण क्षेत्रातील चंद्रशेखर महादेवराव मेश्राम, व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील कल्पना मोरपारिया, सामाजिक कार्यकर्ते शंकर बाबा पुंडलिकराव पापळकर या मान्यवरांचा पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.
Latest Marathi News माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण Brought to You By : Bharat Live News Media.