अंडी, केळी वाटप : लाल-हिरव्या ठिपक्याने ठरणार पोषण आहार

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना अंडी, केळी देण्यात येतात. परंतु, या योजनेंंतर्गत पालकांनी अंडी खाण्यास सहमती दर्शवलेल्या मुलांच्या ओळखपत्रावर लाल रंगाचा, तर शाकाहारी मुलांच्या किंवा पालकांनी अंडी खाण्यास नकार दिलेल्या मुलांच्या ओळखपत्रावर हिरवा ठिपका दिला जाणार आहे. तसेच, शाळेतील 40 टक्के विद्यार्थ्यांनी अंड्याऐवजी केळीची मागणी केल्यास त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना केळी किंवा अपवादात्मक स्थितीत स्थानिक फळ दिले जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
विद्यार्थ्यांना अंडी, केळी देण्याच्या अनुषंगाने येणार्या अडचणी, त्या अनुषंगाने शासनाकडे आलेली निवेदने विचारात घेऊन योजनेच्या अंमलबजावणीत अधिक स्पष्टता येण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सूचना दिल्या आहेत. राज्यातील अनेक नागरी भागात ईस्कॉन संस्थांतर्गत असलेल्या अन्नामृत फाऊंडेशन, अक्षयपात्र या संस्थांमार्फत केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे तयार आहाराचा पुरवठा करण्यात येतो. ईस्कॉन या सेवाभागी संस्थेच्या कार्यप्रणालीचा विचार करता, नागरी भागात अन्नामृत फाऊंडेशन, अक्षयपात्र या संस्थांच्या अधिनस्त असणार्या शाळांमधील संपूर्ण विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्रति विद्यार्थी पाच रुपये रकमेच्या मर्यादेत केळी अथवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळ उपलब्ध करून देण्यास अनुमती देण्यात येत आहे.
नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत तयार आहाराचा पुरवठा महिला बचत गटामार्फत करण्यात येतो. नागरी भागातील बचत गटाकडील लाभार्थी संख्या विचारात घेता ज्या शाळांमधील विद्यार्थ्यांपैकी 40 टक्के विद्यार्थ्यांनी अंड्याऐवजी केळी देण्याची मागणी केल्यास संबंधित शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना केळी अथवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळ देण्यास अनुमती देण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. विद्यार्थ्यांना ओळखपत्राच्या वाटपाबाबत संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत.
पालकांसमोरच विद्यार्थी वाचणार धडा!
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पालकांसमोर वाचन हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये आता राबविण्यात येणार आहे. तशा प्रकारचे निर्देश जिल्हा परिषदेच्या प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्यांना दिले आहेत. गायकवाड यांनी दिलेल्या निर्देशानुसार, शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढवण्यासाठी पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पालकासमोर वाचन हा उपक्रम सर्व शाळांमध्ये राबविणे गरजेचे आहे. त्यानुसार अध्ययन निष्पतीनुसार भाषा साक्षरता व संख्याज्ञान साक्षरता जाणून घेण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत आमंत्रित करून त्यांच्यासमोर विद्यार्थ्यांचे वाचन व लेखन हा उपक्रम राबवावा. त्यासंदर्भात सर्व शाळांना सूचित करावे आणि संबंधित उपक्रमाची 100 टक्के अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट केले आहे.
Latest Marathi News अंडी, केळी वाटप : लाल-हिरव्या ठिपक्याने ठरणार पोषण आहार Brought to You By : Bharat Live News Media.
