सरकारचा तीन कलमी प्रस्ताव जरांगेंनी फेटाळला

पुणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलनप्रश्नी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने दिलेला तीन कलमी प्रस्ताव मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांनी बुधवारी फेटाळला. दरम्यान, जरांगे यांच्या मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार कामाला लागले असून, कोणत्याही परिस्थितीत जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र, जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. (Manoj Jarange Patil)
छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड आणि जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी रांजणगाव गणपती येथे जरांगे यांची भेट घेतली. पहाटे चार वाजता सुरू झालेली चर्चा दीड तास सुरू होती. राज्यात 54 लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. ही सकारात्मक बाब असल्याचे मान्य व्हावे. गावागावांत आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असे त्यांनी जरांगे यांच्या निदर्शनाला आणून दिले. क्युरेटिव्ह पिटीशनवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, त्यातून आरक्षणाला दिशा मिळेल, असे अधिकार्यांनी जरांगे यांना सांगितले. राज्य सरकारच्या वतीने अधिकार्यांनी तीन कलमी प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. मात्र, त्यांनी तो फेटाळला. विभागीय आयुक्त यांच्या शिष्टमंडळालादेखील त्यांनी आपली भूमिका बोलून दाखवली. त्यामुळे पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सरकारचे प्रतिनिधी तेथून बाहेर पडले. (Manoj Jarange Patil)
Latest Marathi News सरकारचा तीन कलमी प्रस्ताव जरांगेंनी फेटाळला Brought to You By : Bharat Live News Media.
