मुख्यमंत्री शिंदेसह मंत्रिमंडळ ५ फेब्रुवारीला अयोध्या दौऱ्यावर

नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता असलेले सर्व मुख्यमंत्री मंत्रिमंडळासह अयोध्यावारी करणार आहेत. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ ५ फेब्रुवारीला अयोध्येला जाणार असल्याचे समजते. यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी भाष्य केले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा ही मोठी रणनिती मानली जात आहे.
२२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत प्रभू रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतील मंदिरात करण्यात आली. या कार्यक्रमाला देशातील सर्व क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर अयोध्येत जाणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच आता भाजपने मित्रपक्षांसह आपले सर्व मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला अयोध्येत आणण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार एक वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या वेळापत्रकात त्रिपुरा, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, गोवा, आसाम, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्य देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ ५ फेब्रुवारीला अयोध्येला येणार आहे. एकाच विमानातून संपूर्ण मंत्रिमंडळ प्रवास करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण मंत्रिमंडळासह प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतील. सोबतच ते शरयु किनारी महाआरती करतील आणि हनुमानगढीचेही दर्शन घेणार असल्याचे समजते. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून बरेच मोठे राजकारण महाराष्ट्रात पेटले होते, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या होत्या. एकनाथ शिंदे यांना निमंत्रण मिळाले होते. उद्धव ठाकरे यांना मात्र निमंत्रण उशिरा मिळाले होते. यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते की, संपूर्ण मंत्रिमंडळासह ते जाणार आहेत.
भाजपचा हेतू काय?
भाजपने राम मंदिराच्या निमित्ताने देशभर लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अक्षता वाटप आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हा प्रयत्न झाला होता. देशभरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राम मंदिराच्या निमित्ताने देशातील वातावरण राममय झाले असताना मित्रपक्षांसह सत्ता असलेल्या सर्वच राज्यातील मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ अयोध्या वारी करणार आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा लोकांपर्यंत भाजपला पोहोचता येणार आहे. याचा मोठा फायदा भाजपला येणाऱ्या काळात पर्यायाने लोकसभा निवडणुकांमध्ये होऊ शकतो.
कोणते मुख्यमंत्री कधी जाणार?
३१ जानेवारीला त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि मंत्री
१ फेब्रुवारी उत्तराखंड मुख्यमंत्री आणि मंत्री
५ फेब्रुवारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मंत्री
६ फेब्रुवारीला अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंत्री
९ फेब्रुवारीला हरियाणाचे मुख्यमंत्री आणि मंत्री
१२ जानेवारीला राजस्थानचे मुख्यमंत्री आणि मंत्री
१५ फेब्रुवारीला गोव्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री
२२ फेब्रुवारीला आसामचे मुख्यमंत्री आणि मंत्री
२४ फेब्रुवारीला गुजरातचे मुख्यमंत्री आणि मंत्री
४ मार्चला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंत्री
२२ तारखेला मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लाखो भाविक अयोध्येत दाखल झाले. सुरक्षा व्यवस्थेवर यामुळे मोठा ताण आल्याचेही पाहायला मिळाले. त्यानंतर सलग विविध राज्यांचे मुख्यमंत्री येत असताना पुन्हा एकदा अयोध्यातील सुरक्षेच्या निमित्ताने उत्तर प्रदेश राज्य प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.
Latest Marathi News मुख्यमंत्री शिंदेसह मंत्रिमंडळ ५ फेब्रुवारीला अयोध्या दौऱ्यावर Brought to You By : Bharat Live News Media.
