Pune : आले काढणीसाठी परप्रांतीय मजूर

पारगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात परजिल्ह्यातून नव्हे तर परराज्यातील शेतमजूर शेतीकामांसाठी दाखल झाले आहेत. मध्य प्रदेशातून जवळपास 20 मजुरांची जोडपी या परिसरात आले काढणीसाठी दाखल झाली आहेत.
तालुक्याचा पूर्व भाग हा घोड, मीना या नद्यांमुळे बागायती बनला आहे. येथे सर्वच प्रकारची शेतीपिके शेतकरी घेत आहेत. परंतु, या परिसरात मजूर टंचाईची समस्या शेतकर्यांसाठी कायमच डोकेदुखीची बनली आहे. सततच्या मजूर टंचाईमुळे शेती कामांवर परिणाम होत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. या भागात पूर्वीपासून खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांच्या आदिवासी भागातील शेतमजुरांच्या टोळ्या शेतीकामांसाठी येत असतात. परंतु, गेल्या दोन- तीन वर्षांपासून या शेतमजुरांच्या संख्येत झपाट्याने घट झाल्याचे दिसत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून यवतमाळ, वाशिम येथील शेतमजुरांची कुटुंबे शेतीकामासाठी दाखल होऊ लागली. परंतू, आता परजिल्ह्यातून नव्हे तर परराज्यातून शेतमजूर शेती कामांसाठी येऊ लागले आहेत. सध्या खडकी परिसरात आले काढणी सुरू आहे. यासाठी मध्य प्रदेशातून 20 शेतमजुरांची जोडपी दाखल झाली आहेत. हे शेतमजूर आले, केळी काढणी ही कामे करत आहेत. काम पूर्ण होईपर्यंत ते शेतांमध्येच पाल ठोकून राहात आहेत.
या परिसरात शेतमजुरांच्या कायमच्या टंचाईने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतमजुरांअभावी शेतीकामे खोळंबतात. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होते. जादा मजुरी देऊन शेतकरी कामे उरकून घेतात. अनेक वेळा कामे उरकण्यासाठी मजुरांच्या हातापाया पडण्याची वेळ येते.
– रोहिदास वाघ, शेतकरी, रांजणी.
Latest Marathi News Pune : आले काढणीसाठी परप्रांतीय मजूर Brought to You By : Bharat Live News Media.
