बलात्कार प्रकरणात संशयिताला निर्दोष ठरविणारा पोलिसांचा अहवाल फेटाळला

सोलापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : सोलापूर येथील एका शाळेतील शिक्षिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे सोलापूरचे माजी महापौर व राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष मनोहर गणपत सपाटे (रा. निराळे वस्ती, सोलापूर) याचेविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याला निर्दोष ठरविणारा ‘ब’ समरी अहवाल न्यायालयात दाखल केला होता. हा अहवाल फेटाळून फौजदार चावडी पोलिसांना पुढील तपास करण्याचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. के.जंगम यांनी दिला आहे.
पीडिता ही सोलापूर येथील एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीस होती. १९९३ मध्ये या संस्थेचे अध्यक्ष तथा तत्कालीन महापौर मनोहर सपाटे हा झेंडा वंदनसाठी शाळेत आला होता. यावेळी सपाटे याने पीडित शिक्षिकेला शाळेच्या कार्यालयात बोलावून घेतले आणि “मी या संस्थेचा अध्यक्ष व महापौर आहे, माझ्याशी शरीरसंबंध ठेव. मी तुझ्याबरोबर लग्न करतो, नकार दिला तर तूला नोकरीतून काढेन” अशी धमकी देवून पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर सपाटे याने नोकरीवरून काढण्याची व जीवे मारण्याची धमकी देवून तसेच लग्नाचे आमीष दाखवून अनेकवेळा अत्याचार केले. त्यानंतर २०२० मध्ये पीडितेला खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत नोकरीचा राजीनामा लिहून घेतला. निवृत्तीच्या पैशाची मागणी केली असता सपाटे याने पीडितेकडेच दहा लाखाची मागणी केली. त्यावेळी पीडितेने घाबरून पैसे दिले. त्यानंतर सपाटे याने पुन्हा बंदुकीचा धाक दाखवून पीडितेव अत्याचार केला, अशी फिर्याद पीडित शिक्षिकेने दिली आहे.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी केला. त्यांनी १० साक्षीदारांचे जवाब नोंदवून फिर्यादीने खोटा गुन्हा दाखल केला असा निष्कर्ष काढून सपाटे विरुद्ध कोणताही पुरावा मिळून आलेला नाही, असा ‘ब’ समरी अहवाल न्यायालयात दाखल केला.
त्यामध्ये मूळ फिर्यादीतर्फे अॅड. संतोष न्हावकर यांनी हरकत अर्ज दाखल करून तपास अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक सपाटेच्या दबावाखाली तो अध्यक्ष असलेल्या ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचेच जवाब नोंदवले. सपाटे यास फायदा होईल असा पुरावा तयार केल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले. तसेच फिर्यादीची हकीकत खरी आहे, असे सांगणाऱ्या साक्षीदारांनी पोलीस स्टेशनला अनेक हेलपाटे मारूनही त्यांचा पुरावा नोंदविणे व जवाब नोंदविण्याचे टाळले. त्याचप्रमाणे सपाटे स्वतःचे साक्षीदार पोलीस स्टेशनला घेऊन गेल्याचे व स्वतंत्र साक्षीदारांनी पोलीस स्टेशनला चकरा मारल्याचे शाबीत करण्यासाठी फिर्यादीने पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. मात्र ती जाणीवपूर्वक फेटाळून तो पुरावा पोलिसांनी नष्ट केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
हा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने पोलिसांचा अहवाल फेटाळून पुन्हा तपास करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे फौजदार चावडी पोलिसांवर बरगंडे प्रकरणानंतर पुन्हा दुसऱ्यांदा नामुष्कीची वेळ ओढवलेली आहे. यात मूळ फिर्यादीतर्फे अॅड. संतोष न्हावकर, अॅड. राहुल रुपनर, अॅड. सोहेल शेख, अॅड. शैलेश पोटफोडे काम पाहत आहेत.
Latest Marathi News बलात्कार प्रकरणात संशयिताला निर्दोष ठरविणारा पोलिसांचा अहवाल फेटाळला Brought to You By : Bharat Live News Media.
