धुळे : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले महत्वाचे निर्देश

धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा-भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी जिल्हा पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. या पार्श्वभूमीवर सर्व विभागप्रमुखांनी आपल्याला नेमून दिलेली कामे समन्वयाने करीत वेळेत पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय प्रजासत्ताकाचा 74 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी पूर्व तयारीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे,निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, सहायक आयुक्त नगरविकास शिल्पा नाईक यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, जिल्हा पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा सकाळी 9.15 वाजता कार्यक्रम होईल. या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालय परिसर संबंधित विभागाने स्वच्छ ठेवावा. मैदानावर मुख्य कार्यक्रम होणार असल्याने मैदानाचे सपाटीकरण, साऊंड सिस्टीम व आवश्यक दुरुस्तीच्या कामाला गती द्यावी. मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या नियोजनासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे. कार्यक्रमाच्या दिवशी आवश्यक पोलीस बँड पथक, पोलीस पथक उपस्थित ठेवावे. पुरस्कार वितरणाची संबंधित विभागाने यादी करावी. शहरातील सर्व पुतळे स्वच्छ धुवून परिसर स्वच्छ ठेवावा. कार्यक्रमस्थळी पिण्याचे पाणी, चहापानाची व्यवस्था करावी. तसेच मुख्य शासकीय समारंभास आलेल्या निमंत्रित तसेच मान्यवरांच्या बसण्याची व्यवस्था करावी.
पोलिस विभागाने प्रांगणात सुरक्षेचे नियोजन करावे. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ध्वजवंदन कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रथमोपचारासह सर्व साहित्य, आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. शिक्षण विभागाने मुख्य शासकीय समारंभाकरीता सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करीत त्याचा नियमितपणे सराव करून घ्यावा. असेही निर्देश जिल्हाधिकारी गोयल यांनी दिले. त्याच प्रमाणे मुख्य शासकीय समारंभ कार्यक्रमांस लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, जिल्हा गौरव व हुतात्मा स्मारक समिती सदस्य, दलित मित्र पुरस्कार प्राप्त व्यक्ती, स्थानिक राजकीय पक्षाचे प्रमुख, पत्रकार, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीं, शासकीय, निमशासकीय कार्यालयाचे प्रमुखांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे यांनीही मार्गदर्शन केले
Latest Marathi News धुळे : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले महत्वाचे निर्देश Brought to You By : Bharat Live News Media.
