नथनीचं कौतुक करून घेणार्यांनो, नाक देणार्यास विसरू नका

अकोले : Bharat Live News Media वृत्तसेवा : भंडारदारा व निळवंडे धरणांच्या उभारणीसाठी अकोलेकरांनी केलेला त्याग मोठा आहे. धरणं व कालव्यांच्या कामासाठी ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचा पुढाकार कोणीही नाकारू शकणार नाही असे सांगत, जलनायक-खलनायक कोणीही होत असले तरी नथनीचं कौतुक करून घेणार्यांनी नाक देणार्यास विसरून नये, असा टोला महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी विरोधकांना लगावला. दरम्यान, डावा कालव्याप्रमाणे उजव्या कालव्याला पाणी सोडण्याचा दिलेला शब्द महायुती सरकारने पूर्ण केल्याचे समाधान वाटते, असे ते म्हणाले.
आयोध्येमधील प्रभू श्रीराम मूर्ती स्थापनेच्या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, खा. डॉ. सुजय विखे पा., जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले, माजी आ. वैभव पिचड, सीताराम गायकर, भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, जलसंपदाचे बाळासाहेब शेटे, कैलास ठाकरे व शेतकरी उपस्थित होते.
मंत्री विखे म्हणाले, अनेक वर्षे लाभक्षेत्रातील शेतकर्यांना पाण्याचा संघर्ष करावा लागला, पण आता पाण्याची प्रतिक्षा संपली. डाव्या कालव्याप्रमाणेच उजव्या कालव्याला पाणी मिळाल्याने दोन्ही कालव्यांवरील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे सांगत, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या पुढाकाराने वरच्या भागातील कालव्यांच्या कामांना सुरूवात झाल्यामुळे पाणी शेवटच्या गावापर्यंत मिळण्यात यश आले. धरणांसह कालव्यांचे काम अकोले तालुक्यात होत होते, पण आंदोलने मात्र खालच्या भागात सुरू होती. धरण व कालव्यांची कामे पूर्ण होण्यास मधुकरराव पिचड यांचे योगदान मोठे आहे. या भागात शेतकर्यांनी जमिनी दिल्या नसत्या तर प्रकल्पसुध्दा उभा राहू शकला नसता. या भागात शेतकर्यांच्या त्यागामुळेच भंडारदारा, निळवंडे प्रकल्प उभे राहिले. तालुक्याची समृद्धी या प्रकल्पांमुळे असल्याचे नमूद करून, ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यास आले होते, तो दिवस सर्वांसाठी महत्वपूर्ण होता. आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम मूर्तीच्या स्थापनेच्या दिवशी उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय लाभक्षेत्रातील शेतकर्यांना दिलासा देणारा आहे.
डाव्या कालव्यात पाणी सोडल्यानंतर अकोलेत काही गावांच्या शेतकर्यांचे नुकसान झाले. भरपाईचा प्रस्ताव मंजूरीस पाठविला आहे. मदत लवकर मिळावी याकरीता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. शेतकर्यांच्या दळण-वळणाकरीता 123 लोखंडी पुलांची मागणी होत आहे. या प्रस्तावास मान्यता देण्यास पाठपुरावा करु, अशी ग्वाही मंत्री विखे यांनी दिली. माजीमंत्री मधुकराव पिचड यांनी धरण व कालव्यांच्या कामाच्या वाटचालीचा आढावा घेतला. अनेकांच्या त्यागाने हे प्रकल्प उभे राहिले. मधुकर पिचड यांनी काय केले, असा प्रश्न करणार्यांचा समाचार घेत तालुक्यात झालेले काम ही कामाची साक्ष असल्याचे सांगत, पुढच्या पिढीने या कामांचा वारसा पुढे घेवून जावे, असे आवाहन पिचड यांनी केले. यावेळी शिवाजी कर्डिले, वैभव पिचड यांची भाषणे झाली. प्रास्ताविक अभियंता कैलास ठाकरे यांनी केले.
अगस्ती ॠषींच्या पावन भूमीत दुग्ध- शर्करा योग!
रामायणातील महर्षी अगस्ती ॠषी व प्रभू श्रीरामांच्या अकोले येथील भेटीचा संदर्भ देत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. म्हणाले, आज आयोध्येचा ऐतिहासिक कार्यक्रम व अगस्ती ॠषींच्या पावन भूमीत पाणी सोडण्याचा कार्यक्रम हा दुग्ध- शर्करा योग आहे.
कालव्यावरील पुलाचे ‘श्रीराम जलसेतू’ नामकरण!
प्रभू श्रीरामाचा जयघोष करीत उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. कालव्यावरील पुलास ‘श्रीराम जलसेतू’ नाव देण्यात आले, अशी घोषणा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी केली. या नावाला राज्य सरकार तत्काळ मान्यता देईल, असा विश्वास व्यक्त करुन, प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना मंत्री विखे यांनी जलसंपदा अधिकार्यांना केल्या.
Latest Marathi News नथनीचं कौतुक करून घेणार्यांनो, नाक देणार्यास विसरू नका Brought to You By : Bharat Live News Media.
