नंदुरबारच्या आदित्य ब्राह्मणेला राष्ट्रपतींच्या हस्ते मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान

नंदुरबार : Bharat Live News Media वृत्तसेवा
महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या आदित्य ब्राह्मणेला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला हाेता.
आदित्यने आपल्या चुलत भावाचा जीव वाचवण्यासाठी प्राण गमावले. आदित्यला राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदित्यचा लहान भाऊ आरुषने हा पुरस्कार स्वीकारला. आदित्य आणि त्याचा चुलत भाऊ नदीच्या किनाऱ्याजवळ खेळत होते. खेळताना त्याचा चुलत भाऊ बुडू लागला. हे पाहून आदित्यने धोका असलेला उतार लक्षात न घेता खोल पाण्यात उतरून आपल्या चुलत भावाला वाचवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने, आदित्य खूप खोल गेला, त्यामुळे त्याला लगेच शोधणे कठीण झाले. आदित्यचा प्रयत्न व्यर्थ गेला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. मात्र, कठीण प्रसंगात अतुलनीय शौर्य दाखविले. त्याच्या या शौर्यपूर्ण प्रयत्नाबद्दल त्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे.
‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी)’ असामान्य क्षमता आणि अतुलनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना दिला जातो. शौर्य, कला आणि संस्कृती, पर्यावरण, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा या श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 5 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना हे पुरस्कार प्रदान झाले. प्रत्येक पुरस्कारार्थीला पदक, प्रमाणपत्र आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
यंदाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी देशातील 18 जिल्ह्यांमधून असामान्य कामगिरी करणाऱ्या 19 मुलांची निवड करण्यात आली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मंगळवारी, दि. 23 जानेवारी, 2024 रोजी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधतील. 26 जानेवारी, 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पथ संचलनातही ही मुले सहभागी होतील.
निवड झालेल्या मुलांच्या यादीमध्ये शौर्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या श्रेणींमध्ये प्रत्येकी एका मुलाचा तर समाजसेवेच्या श्रेणीत चार मुलांचा; क्रीडा प्रकारात पाच आणि कला आणि संस्कृती श्रेणीत सात मुलांचा समावेश होता. या यादीत 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 9 मुले आणि 10 मुलींचा समावेश होता.
Latest Marathi News नंदुरबारच्या आदित्य ब्राह्मणेला राष्ट्रपतींच्या हस्ते मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान Brought to You By : Bharat Live News Media.
