Crime News : सावधान..! साधुसंतांच्या वेशात फिरताहेत ‘रावण’

संतोष शिंदे
पिंपरी : साधुच्या वेषेत दारात येणार्या अज्ञात व्यक्तीला तुम्ही घरात घेत असाल, तर जरा सावध व्हा..! कारण मागील काही दिवसांत साधुसंतांच्या वेशभूषेत आलेल्या रावणांनी म्हणजेच ठगांनी फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनीदेखील याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
अयोध्येत श्रीरामाच्या बालस्वरुपातील मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे. भारतवासीयांनी देशभर वेगवेगळे उपक्रम राबवून रामलल्लाचे स्वागत केले. काही महिन्यांपासून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. माध्यमांवर याबाबत मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध देण्यात आली. ज्यामुळे घराघरात भक्तिमय वातावरण असल्याचे पहावयास मिळते. दारात साधुसंतांच्या वेशात येणार्या बुवाबाबांची मनोभावे सेवा केली जात आहे.
दरम्यान, याचा फायदा घेत काही ठगांनी साधुसंतांच्या वेशभूषेत जाऊन सर्वसामान्यांची लूटमार करण्याचा गोरख धंदा सुरू केला आहे. आराध्य देवतांच्या नावाखाली भुरळ पाडून नागरिकांच्या अंगावरील दागिने, पैसे चोरून नेत असल्याचे प्रकार शहर परिसरात समोर येऊ आले आहेत. त्यामुळे साधुसंतांच्या वेशभूषेत आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. टोळी असण्याची शक्यता मागील काही महिन्यांत शहराच्या वेगवेगळ्या भागात असे प्रकार घडल्याचे समोर आले आहेत. बहुतांश प्रकरणात मोठा ऐवज गेला नसल्याने पोलिसांपर्यंत तक्रारी गेल्या नाहीत; मात्र वाढत्या प्रकारांमुळे यामागे टोळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
..अशी करतात फसवणूक
चोरटे साधुसंतांच्या वेशभूषा परिधान करून दारात येतात. सुरुवातीला पिण्यासाठी पाणी मागून खासगी माहिती विचारतात. त्यानंतर देवदेवतांच्या विषयावर बोलून भुरळ पाडली जाते. त्यानंतर विश्वास संपादन केला की, दानधर्म करण्यासाठी भाग पाडले जाते. तसेच, बोलताना हात चलाखीने मौल्यवान वस्तू काखेत अडकवलेल्या झोळीत टाकल्या जातात. त्यानंतर काहीतरी बहाणा काढून तेथून पळ काढला जातो.
वृद्ध महिला टार्गेट
साधुसंतांच्या वेशात आलेल्या चोरट्यांकडून घराबाहेर एकट्या बसलेल्या वृद्ध महिला हेरल्या जात आहेत. देवांच्या नावे भावनिक साद घालून त्यांना अंगावरील सोने काढून देण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे वृद्धांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
गुप्तदान करण्याच्या बहाण्याने गंडा
गुप्तदान करण्याच्या बहाण्याने अज्ञाताने व्यावसायिकाचे सोन्याचे दागिने लंपास केले. हा प्रकार 16 जानेवारी रोजी निगडी गावठाण येथील वैष्णवी जनरल स्टोअर येथे घडला. याप्रकरणी महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला दुकानात असताना आरोपी दुकानात आला. त्याने साईबाबांना मंदिरात गुप्तदान करायचे आहे, असे फिर्यादी यांना सांगितले. फिर्यादी यांना भुरळ पाडून त्यांच्याकडील 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, दोन अंगठ्या असे एकूण 81 हजार रुपयांचे दागिने लंपास केले.
गंठण पळवले
विश्वास संपादन करून चोरट्याने एका महिलेचे दीड लाखाचे गंठण चोरून नेले. ही घटना चाकण येथे उघडकीस आली. आरोपीने फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला. दान करण्याच्या वस्तूला सोने लावून द्या, असे सांगितले. त्यानुसार, फिर्यादी यांनी विश्वासाने त्यांचे साडेतीन तोळ्याचे गंठण काढून आरोपीला दिले. त्यानंतर आरोपीने हात चालाखीने फिर्यादी यांचे दीड लाख रुपयांचे गंठण लंपास केले.
घरात किंवा दुकानात आलेल्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. आपली खासगी माहिती त्याच्याबरोबर शेअर करू नये. चोरटे वेगवेगळ्या वेशभूषा करून नागरिकांना फसवत असल्याचे समोर येऊ लागले आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
– सतीश माने, सहायक आयुक्त, पिंपरी-चिंचवड
हेही वाचा
Shiv Sena News : शिवसेनेचे वाघ नसते, तर काल रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अशक्य- संजय राऊत
आंबेडकरवाद्यांनी इतरांना सामावून घेतले पाहिजे : डॉ. सुनीलकुमार लवटे
सूस रोडवरील बसथांबा चोरण्याचा प्रयत्न? : विघ्नहर्ता चौकातील प्रकार
Latest Marathi News Crime News : सावधान..! साधुसंतांच्या वेशात फिरताहेत ‘रावण’ Brought to You By : Bharat Live News Media.
