श्रीराम हीच ऊर्जा ठरणार भारताच्या उदयाची साक्ष : पंतप्रधान मोदी
अयोध्या; वृत्तसंस्था : आजचा दिवस म्हणजे देवापासून देशापर्यंतचा आणि श्रीरामापासून राष्ट्राच्या चैतन्यापर्यंतचा प्रवास आहे. श्रीरामाचे मंदिर झाले तर देशात आग लागेल, असे काही जण म्हणत होते; पण त्यांना श्रीराम कळलेलाच नव्हता. अरे… श्रीराम ही काही आग नव्हे, श्रीराम तर एक ऊर्जा आहे. ही ऊर्जाच भारताच्या उदयाची साक्ष ठरणार आहे. वारसा ते नवनिर्मिती या प्रवासाची साक्ष ठरणार आहे. परंपरांचा समृद्ध वारसा जपताना नवनिर्मितीच्या मार्गावरून आपण भविष्यातील अनंत संधींना सिद्धीपर्यंत नेणार आहोत, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेची अनुष्ठाने पार पडल्यानंतर उपस्थित जनसमुदाय व संपूर्ण देशाला तसेच जगभरातील श्रीराम भक्तांना उद्देशून ते बोलत होते. आपल्या 35 मिनिटांच्या भाषणातून पंतप्रधानांनी अनेक विषयांना स्पर्श केला.
पंतप्रधान म्हणाले, श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा हा देशातील नव्या कालचक्राचा उदय आहे. श्रीराम हे काही विवाद नव्हेत, ते तर समाधान आहेत! श्रीराम ही भारताची प्रतिष्ठा आहे आणि भारताची प्रतिमाही आहे. श्रीराम हे हजारो वर्षांपासून देशाची प्रेरणा आहेत. याच प्रेरणेतून देश म्हणून आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर झेंडा गाडणारे जगातील पहिलेच ठरलो. आपल्या आसमंतातून आज ‘तेजस’ (युद्धविमान) घोंगावते आहे. आपल्या समुद्रातून ‘विक्रांत’ (युद्धजहाज) गर्जतो आहे. विष्णूच्या दशावतारांप्रमाणे पंतप्रधानांचे भाषणही दशसूत्रीने जणू गुंफलेले होते. श्री रामलल्लापासून देश, देशातील 140 कोटी भारतीय, देशाचा समग्र द़ृष्टिकोन, देशाची आगामी वाटचाल आदी 10 मुद्दे पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून उलगडले.
भाषणाची ही दशसूत्री…
1) श्री रामलल्लाबद्दल : श्री रामलल्लांना आता तंबूत राहावे लागणार नाही. ते भव्यदिव्य मंदिरात राहतील. श्रीराम हे क्षमाशील आहेत. पाचशे वर्षे त्यांना जे कष्ट झाले, त्याबद्दल ते आम्हाला क्षमा करतील.
2) 22 जानेवारीबद्दल : 22 जानेवारी 2024 रोजी उगविलेला सूर्य एका अद्भुत आभेसह उगविलेला आहे. 22 जानेवारी ही दिनदर्शिकेतील केवळ एक तारीख नाही, ती एका नव्या कालचक्राचा उदय आहे. आजचा दिवस काळाच्याही स्मृतीत चिरंतन राहील.
3) देशातील वातावरणाबद्दल : देशाच्या गावागावांतून भजन-कीर्तन होत आहे. सायंकाळी घरोघरी दिवेही लावले जातील. देशात दिवाळी आहे.
4) स्वत:च्या व्रताबद्दल : प्राणप्रतिष्ठेचा मुख्य यजमान म्हणून मी 11 दिवस यमनियम पाळले. या व्रत-अनुष्ठानांदरम्यान प्रभू श्रीरामाच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणी दर्शनाला म्हणून गेलो आणि तेथील माती कपाळावर लावून घेतली. धनुष्कोडीतील रामसेतूच्या प्रारंभबिंदूपासून ते अयोध्येतील शरयूच्या तटापर्यंत श्रीरामाच्या परतीच्या वाटेवरून प्रवासाचा योग यानिमित्ताने माझ्या वाट्याला आला.
5) न्यायपालिकेबद्दल : आमच्या त्यागात, तपस्येत, पूजेत काही उणिवा नक्कीच राहिल्या आणि त्यामुळेच इतकी वर्षे श्रीरामाला हक्काचे घर मिळू शकले नाही. मंदिराचे काम इतकी वर्षे झाले नाही. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या प्रतीतही श्रीरामलल्ला विराजमान आहेत, याउपर जन्मभूमीत विराजमान व्हायला त्यांना उशीरच झाला. श्रीरामाच्या अस्तित्वावरच कायद्याची लढाई अनेक दशके चालली. आमची इभ्रत राखल्याबद्दल मी न्यायपालिकेचा आभारी आहे.
6) श्रीरामावरून विवादांबद्दल : अनेक देश स्वत:च्याच इतिहासाबद्दल संभ्रमात पडतात. आम्ही आमच्या देशातील हे संभ्रम जेव्हाही दूर करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नव्या अडचणी आमच्या समोर आल्या. आम्ही अत्यंत हळुवारपणे, भावोत्कटतेने संभ्रमाच्या या गाठी उलगडत गेलो. आपल्या देशाचे भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे, यावर आमच्या या कौशल्याने शिक्कामोर्तब केले आहे.
7) सर्वव्यापी श्रीरामाबद्दल : श्रीराम केवळ आमचे नाहीत. सर्वांचे आहेत. श्रीराम हा भूतकाळ, वर्तमान किंवा भविष्यकाळ नाही, तो एक अनंत काळ आहे. श्रीरामाचे हे मंदिरही केवळ मंदिर नाही. भारताच्या द़ृष्टिकोनाचे दर्शन इथे घडते, असे हे स्थळ आहे. श्रीराम भारताचा विचार आहे. श्रीराम हे भारताचे चिंतन आहे. चैतन्य, प्रवाह, प्रभाव, सातत्य हे सारे श्रीराम आहे. श्रीराम विश्व आहे आणि श्रीराम हे विश्वात्मा आहेत. त्यामुळेच जेव्हा श्रीरामाची स्थापना होते, तेव्हा त्याचा प्रभाव येणार्या हजारो वर्षांपर्यंत कायम राहतो.
8) संत, कारसेवकांबद्दल : ज्यात तुम्ही रमता त्यातच श्रीराम वास करतो, असे ऋषीमुनी सांगून गेलेत. प्रत्येक युगात लोक अशा पद्धतीनेच श्रीराम जगत आलेले आहेत. प्रत्येक युगात लोकांनी आपापल्या पद्धतीने श्रीराम अभिव्यक्त केलेला आहे. रामरस म्हणजे एक निरंतर प्रवाह आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर या प्रवाहातील एक मैलाचा दगड आहे. कारसेवक, संत-माहात्म्यांचे आम्ही त्याबद्दल ऋणी आहोत.
9) देशाच्या द़ृष्टिकोनाबद्दल : तुमचे लक्ष्य प्रामाणिक आणि प्रमाणित असेल, तर ते साध्य केले जाऊ शकते. श्रीराम मंदिरासाठी पाचशे वर्षे लढा चालला. पाच शतकांच्या प्रतीक्षेनंतर आम्ही हे लक्ष्य साध्य करू शकलो. आपले आजचे वर्तमान हा लक्ष्यसिद्धीचाच काळ आहे. आमची युवाशक्ती चंद्रावर झेंडा फडकावते आहे. सूर्याचाही वेध घेते आहे. येणारा काळही केवळ आणि केवळ लक्ष्यसिद्धीचा असेल. यशाचा असेल. हे श्रीराम मंदिर त्या प्रत्येक यशाची, लक्ष्यसिद्धीची साक्ष ठरणार आहे.
10) भारतीयांबद्दल : सर्व 140 कोटी भारतीयांनी परिस्थितीच्या नावाने शंख करणे बंद करावे. मी काय करू शकतो, याचाचा विचार करावा. युवकांनी हे विशेषत: ध्यानी घ्यावे. रामायणातील खारीचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर आहे. रामसेतूच्या उभारणीतील तिचा वाटा अगदी इवलासा होता; पण तीही या उभारणीत सहभागी होती. आपण सारे मिळून असेच देश घडवत असतो. कुणाचा वाटा किती, हे महत्त्वाचे नसते. प्रत्येक सांघिक यशामध्ये लहान-मोठ्या प्रत्येक प्रकारच्या प्रयत्नाचे योगदान असते.
Latest Marathi News श्रीराम हीच ऊर्जा ठरणार भारताच्या उदयाची साक्ष : पंतप्रधान मोदी Brought to You By : Bharat Live News Media.