श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर सार्या देशाने साजरी केली दिवाळी
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अयोध्येत सहा दिवसांच्या धार्मिक विधीनंतर सोमवारी श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशभरात म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नागरिकांनी दिवाळी साजरी केली. सारा देश राममय झाल्याचे चित्र दिसले. या पार्श्वभूमीवर, राज्यातही सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे पर्व दिसून आले. मुंबई, पुण्यासह नाशिक, रामटेक, सातारा, सांगली परिसरात भजन, कीर्तन, महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी ठिकठिकाणी मनोहारी रोषणाई करण्यात आली होती. तसेच, शोभेच्या दारूकामाची आतषबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दिल्लीत दाखल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी ‘रामज्योती’ प्रज्वलित केली.
राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, झारखंडमधील मंदिरे फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आली होती. या राज्यांमध्ये विविध ठिकाणी लाखो दिवे प्रज्वलित करण्यात आले. उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ धाममध्ये राम दरबाराची भव्य प्रतिमा लावण्यात आली. जम्मूतील रघुनाथ मंदिरात मोठ्या संख्येने भाविक जमले आणि त्यांनी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले. जम्मूच्या उधमपूरमध्ये तरुणांनी सर्वात उंच मंदिरावर चढून राम ध्वज फडकावला. झारखंडची राजधानी रांचीमध्ये लोकांनी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम साजरा करण्यासाठी रामफेरी काढली.
महाकाल मंदिरात दिवाळीसारखी पूजा
मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात भस्म आरतीच्या वेळी दीपावलीसारखी पूजा करण्यात आली. ओरछा येथे राम राजा सरकार मंदिरात 5,100 मातीचे दिवे प्रज्वलित करण्यात आले. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये पाकिस्तान सीमेजवळही जय श्रीरामचा नाद जोशात घुमला. तेथे बीएसएफच्या जवानांनी तनोट माता मंदिरात रामायण पठण केले. उत्तर प्रदेशात वाराणसीमध्ये महिलांनी हातावर राम नावाची मेहंदी काढल्याचे दिसून आले.
दक्षिणेकडील राज्यांंतही जयघोष
केरळमध्ये तिरुवनंतपूरममधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरासमोर दिवे प्रज्वलित करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. त्याखेरीज आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांतही रामनामाचा जयघोष करण्यात आला. तेथे अनेक मंदिरांमध्ये दिव्यांची आणि फुलांची आरास करण्यात आली होती. याखेरीज या मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीराम मंदिराची प्रतिकृती; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात फुले आणि पानांपासून भगवान श्रीरामाची 50 बाय 60 फूट रांगोळी तयार करण्यात आली होती. श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त पंजाबमधील अमृतसरमध्ये लोकांनी मिरवणूक काढली. जयपूर येथील अल्बर्ट हॉलसमोर श्री रामलल्ला दीपोत्सव पार पडला. तेथे श्रीराम मंदिराची प्रतिकृती बनवून दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. बिहारमध्ये सीतामढी येथील जानकी जन्मभूमी पुनराधाम येथे 51 हजार, रजत द्वार जानकी मंदिर आणि ऊर्विजा कुंड येथे 21 हजार, पंथ पाकड, हलेश्वर स्थान, बगही धाम, वैष्णव मंदिर, नारायण राम जानकी मठ येथे 11 हजार आणि जनकपूर येथील 11 लाख, जिल्ह्यातील शेकडो मठ आणि मंदिरांमध्ये दहा लाखांहून अधिक दिवे लावण्यात आले होते.
पाच हजार मनुकांची रांगोळी
छत्तीसगडमध्येही आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. तेथील लोरमी येथे 5 हजार किलो मनुकांपासून श्रीरामाची रांगोळी तयार करण्यात आली होती. रायपूर येथील दुधाधारी मठात पूजाअर्चा पार पडली. तेथे भगवान श्रीरामाची मूर्ती सुवर्णालंकारांनी सजवण्यात आली होती. याशिवाय रायपूरच्या श्रीराम मंदिरासह राज्यातील अनेक मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
राज्यातही उत्साह, आनंदपर्व
सजविलेली घरे, घरांपुढील रांगोळी, मंगलवाद्यांचे सूर, घराघरांवर उभारलेल्या गुढ्या, श्रीरामाची प्रतिमा असलेले भगवे ध्वज, आतषबाजी, दिव्यांची आरास अशा अपूर्व उत्साहात राज्यातही मुंबई-पुण्यासह, नाशिक, रामटेक, सातारा, सांगली, नागपूरसह सर्वत्र अयोध्येतील श्री रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळा साजरा करण्यात आला. मुंबईत सायन येथे कोळीवाडा परिसरात दहा हजार चौरस फूट जागेत श्रीरामाची मोठी रांगोळी काढण्यात आली होती. याखेरीज विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकमध्ये पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. यानिमित्ताने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सातारा, सांगली येथेही प्रसिद्ध श्रीराम मंदिरांमध्ये उत्साह आणि भक्तीचे वातावरण दिसून आले. नागपूरमध्ये राम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमानाची रांगोळी काढण्यात आली होती. संपूर्ण राज्यात रात्री प्रमुख मंदिरे रोषणाईने उजळून निघाली होती. याप्रसंगी भजन, प्रवचन, कीर्तनाच्या कार्यक्रमांसह यासह अन्य अनेक ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
Latest Marathi News श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर सार्या देशाने साजरी केली दिवाळी Brought to You By : Bharat Live News Media.