अयोध्या; वृत्तसंस्था : आज अयोध्येत प्रभू श्रीराम परतले, त्यांच्यासोबत भारताचे स्वत्त्व परतले आहे. संपूर्ण जगाला येणार्या संकटांतून दिलासा देण्याचे काम भविष्यात भारत करणार आहे. श्रीराम मंदिर झाले आहे, आता रामराज्यही आणावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
अयोध्येत श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर उपस्थितांसमोर सरसंघचालक मोहन भागवत बोलत होते. ते म्हणाले की, आजचा दिवस अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे. प्रभू श्रीराम अयोध्येत आपल्या जन्मभूमीत परतले आहेत. येताना त्यांच्यासोबत भारताचे स्वत्त्व परत आले आहे. भविष्यात संपूर्ण जगाला येणार्या संकटांतून दिलासा देण्याचे काम भारत करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले की, प्रभू श्रीराम हे अयोध्येत आले आहेत. अयोध्येतून बाहेर का गेले होते? रामायण काळात असे का घडले? अयोध्येत वाद झाला. अयोध्या हे त्या पुरीचे नाव आहे, ज्यात कोणताही संघर्ष, कलह आणि अडचण नाही; तरीही प्रभू श्रीराम 14 वर्षे वनवासात गेले होते. संसारातील कलह संपवून ते परत आले होते. आज पाचशे वर्षांनंतर श्री रामलल्ला पुन्हा आले आहेत. ज्यांच्या त्याग, तपश्चर्या आणि प्रयत्नांमुळे आजचा हा सुवर्ण दिवस आपल्याला जीवनाच्या अभिषेकाच्या संकल्पाने पाहायला मिळत आहे, त्यांचे स्मरण केले असल्याचे मोहन भागवत यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदी यांचे कौतुक
भागवत पुढे म्हणाले की, आजचा आनंद अवर्णनीय आहे. श्रीराम मंदिरनिर्मितीमुळे सर्वांमध्ये उत्साहाला उधाण आले आहे. नरेंद्र मोदी कठोर तपस्वी आहेत. सत्य, करुणा, सेवा परोपकाराने रामराज्य होते. आजचा कार्यक्रम नवीन भारताचे प्रतिनिधित्व आहे. श्रीराम मंदिर तयार झाले आहे, आता रामराज्यनिर्मिती करावी. रामराज्य आणणे हे नागरिकांचेही कर्तव्य आहे, असेही भागवत म्हणाले.
समन्वयाने वाटचाल करावी लागेल
भागवत म्हणाले की, चांगले वर्तन ठेवण्यासाठी तपश्चर्या करावी लागते. आपल्याला सर्व मतभेदांनादेखील निरोप द्यावा लागेल. लहान-मोठे मतभेद, छोटे-छोटे वाद होतात. त्यावरून भांडण्याची सवय सोडावी लागेल. आम्ही सर्वांसाठी चालतो, प्रत्येक जण आमचा आहे, म्हणूनच आम्ही चालण्यास सक्षम आहोत. एकमेकांशी समन्वयाने वागणे म्हणजे सत्याचे आचरण होय. करुणा ही दुसरी पायरी आहे, ज्याचा अर्थ सेवा आणि दान आहे.
Latest Marathi News ‘श्रीराम मंदिर झाले, आता रामराज्य आणावे’ Brought to You By : Bharat Live News Media.
‘श्रीराम मंदिर झाले, आता रामराज्य आणावे’