पंतप्रधानांनी कामगारांवर केली गुलाब पुष्पांची वृष्टी
अयोध्या; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत नव्याने बांधलेल्या श्रीराम मंदिराच्या गाभार्यात श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी मोदींनी या मंदिराचे बांधकाम केलेल्या कामगारांवर पुष्पवृष्टी करून त्यांचा आगळा गौरव केला. त्यांची ही कृती लक्षवेधी ठरली असून, सध्या त्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. त्याचवेळी मोदींच्या विनम्रतेचेही कौतुक केले जात आहे.
आपल्या मुख्य भाषणानंतर मोदींनी कौतुक आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीराम मंदिराचे बांधकाम करणार्या कामगारांवर गुलाब पुष्पांची वृष्टी केली. विशेष म्हणजे, हातात परडी घेऊन मोदी कामगारांच्या रांगांमधून फिरले आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव त्यांनी कामगारांवर केला. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी पंतप्रधानांच्या नम्रतेचे आणि सर्वांना सामावून घेण्याच्या कृतीची प्रशंसा केली आहे.
दरम्यान, यापूर्वी माध्यमांशी बोलताना कामगार म्हणाले होते की, आम्ही श्रीरामाचे मंदिर बांधत आहोत याचेच आम्हाला कौतुक वाटते. आम्हाला अजिबात थकवा जाणवत नाही. अहोरात्र काम करूनही स्वतःला थांबवू इच्छित नाही. काम करताना कधी थकवा जाणवला, तर एकदाच रामनामाचा जयघोष करायचो. त्यानंतर थकवा आपोआप पळून जात असे.
Latest Marathi News पंतप्रधानांनी कामगारांवर केली गुलाब पुष्पांची वृष्टी Brought to You By : Bharat Live News Media.