गुर्‍हाळावरून थेट गूळ खरेदीचा शेतकर्‍यांनाच आर्थिक फटका

गुर्‍हाळावरून थेट गूळ खरेदीचा शेतकर्‍यांनाच आर्थिक फटका

डी. बी. चव्हाण

कोल्हापूर : काही व्यापार्‍यांनी थेट गुर्‍हाळावर जाऊन ठोस भावाने गुळाची खरेदी करणे सुरू केले आहे; पण सौद्यात मिळणारा दर आणि गुर्‍हाळावर मिळणारा दर यामध्ये 700 ते 1000 रुपयांचा फरक आहे. यामुळे थेट खरेदी केलेल्या गुळामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसत आहे. बाजार समितीलाही त्याचा तोटा होतो. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्यासाठी आणि बाजार समितीत गुळाची आवक वाढविण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न करण्याची गरज आहे.
शेतकर्‍यांनी आपला गूळ कोठे विक्री करावा, याला बंधने नाहीत; मात्र अधिकृत अडत दुकानदार व खरेदीदार यांना गूळ विक्री करावा, अशी पणन खात्याची सूचना आहे; पण काही शेतकरी आपला गूळ ठोस दराने गुर्‍हाळावरून विक्री करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सुमारे 15 ते 20 गुर्‍हाळांवर गूळ विक्रीचा प्रकार सुरू असल्याचे समजते. त्याला 3800 ते 4000 रुपये क्विंटल दर दिला जातो. सध्या गुळाला चांगली मागणी आहे. त्यामुळे सौद्यात 4800 ते 5100 रुपये असा दर मिळत आहे.
थेट गुर्‍हाळावरून उचललेल्या गुळाचा आणि सौद्यात मिळणार्‍या गुळाच्या दरात सुमारे 1 हजार रुपयाची तफावत दिसत आहे. शेतकर्‍यांनी आपला गूळ सौद्यात न आणल्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसत आहे. विविध कारणांमुळे बाजार समितीत गुळाची आवक दरवर्षी 2 ते अडीच लाख रव्यांची घट होत आहे. त्यात आता व्यापारी थेट गुर्‍हाळावर गूळ खरेदी करत आहेत. त्यामुळे वर्षाला किमान 4 ते 5 लाख रव्यांची परस्पर विक्री होणार आहे.
गुर्‍हाळावरुन थेट गूळ खरेदी केल्याने…
गुर्‍हाळावरून थेट गूळ खरेदी केल्याने शेतकर्‍यांना कमी दर मिळतो; मात्र गुळाच्या पट्टीतून वसूल केली जाणारी हमाली, तोलाई थांबते, वाहतूक खर्च वाचतो; पण खरेदी झालेल्या गुळाचे पैसे मिळण्याबाबत तोंडी करार होतो. मग, पैसे मिळणार का, याची खात्री कोण देणार? गुर्‍हाळावर केल्या जाणार्‍या गुळाच्या वजनाकडे कोण लक्ष देणार, असे अनेक प्रश्न आहेत.
बाजार समितीतील अडत दुकानात गूळ घातल्याने फायदे
अडत दुकानात गूळ घातल्याने प्रतवारीनुसार दर मिळतो. गुळाचे वजन चांगले होते. विक्री झालेल्या मालाचे पैसे मिळतील, याची खात्री दिली जाते. उघड सौद्यामुळे चांगल्या गुळाला चांगला दर मिळतो, गुर्‍हाळावर ठोस भावाने एकदा गूळ विक्री झाली की, शेतकर्‍याच्या हाती काहीच राहत नाही. सौदा आणि ठोस भाव यामधील हा फरक आहे. त्याकडे दोघांनीही लक्ष देण्याची गरज आहे.
The post गुर्‍हाळावरून थेट गूळ खरेदीचा शेतकर्‍यांनाच आर्थिक फटका appeared first on पुढारी.

कोल्हापूर : काही व्यापार्‍यांनी थेट गुर्‍हाळावर जाऊन ठोस भावाने गुळाची खरेदी करणे सुरू केले आहे; पण सौद्यात मिळणारा दर आणि गुर्‍हाळावर मिळणारा दर यामध्ये 700 ते 1000 रुपयांचा फरक आहे. यामुळे थेट खरेदी केलेल्या गुळामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसत आहे. बाजार समितीलाही त्याचा तोटा होतो. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्यासाठी आणि बाजार समितीत गुळाची आवक वाढविण्यासाठी …

The post गुर्‍हाळावरून थेट गूळ खरेदीचा शेतकर्‍यांनाच आर्थिक फटका appeared first on पुढारी.

Go to Source