शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे नाशिकमध्ये भगवा पंधरवडा
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा– अयोध्येत सोमवारी (दि. २२) रामलल्ला प्रतिष्ठापना, मंगळवारी (दि. २३) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, तर शनिवारी (दि. २७) धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या मायको सर्कल येथील मध्यवर्ती कार्यालयात पालकमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. रामभक्तांसाठी व शिवसैनिकांसाठी ऐतिहासिक दिवस असून, संपूर्ण भारतच नव्हे, तर जगात हा दिवस साजरा केला जात आहे. नाशिक शहर व प्रभू श्रीराम यांचे वेगळे ऐतिहासिक नाते असून, नाशिक महानगरातदेखील तेवढ्याच मोठ्या उत्साहात शिवसेनेच्या वतीने हा सोहळा साजरा केला जाणार आहे. सर्व शिवसैनिकांनी यात आपला सहभाग द्यावा, असे आवाहन पालकमंत्री भुसे यांनी या बैठकीत केले. जिल्हाध्यक्ष बोरस्ते यांनी भगवा सप्ताहांतर्गत शिवसेनेच्या शाखा उद्घाटन, विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळे, संपर्क कार्यालयांची उद्घाटने, वैद्यकीय शिबिर, शासकीय योजनांचे शिबिर, महिला आघाडीच्या वातीने हळदी-कुंकू समारंभ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. शहरातील प्रमुख चौक भगवे करण्यात आले असून, ठिकठिकाणी तीन फुटी मोठे आकाशकंदील लावून भगवे वातावरण तयार करण्यात आले आहे. याप्रसंगी युवासेना नाशिक लोकसभा विस्तारक योगेश बेलदार, उपजिल्हाप्रमुख श्यामकुमार साबळे, शिवाजी भोर, दिगंबर मोगरे, शशिकांत कोठुळे, प्रमोद लासुरे, अमोल सूर्यवंशी, नाशिक लोकसभा संघटक योगेश म्हस्के, विस्तारक सोपान देवकर, विधानसभाप्रमुख विनायक आढाव, रोशन शिंदे, नगरसेवक आर. डी. धोंगडे आदी उपस्थित होते.
नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रांचे वाटप
पालकमंत्री भुसे यांच्या प्रमुख उपस्थित, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील पंचवटी व जेलरोड नाशिकरोड विभागातील शिवसेना विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तिपत्रांचे वाटप करण्यात आले. विविध पक्षसंघटनांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी शिंदे गटात प्रवेश केला.
हेही वाचा;
वाशिम : घरफोडीत साडेसहा लाखांचा ऐवज लंपास; ड्रीमलँड सिटीमधील घटना
PM मोदींनी हेलिकॅप्टरमधून शूट केला अयोध्या राम मंदिराचा व्हिडिओ
Nashik Crime I क्रेडिट कार्डधारकांना ३४ लाखांचा गंडा
Latest Marathi News शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे नाशिकमध्ये भगवा पंधरवडा Brought to You By : Bharat Live News Media.