‘मराठ्यांनी थांबावे, ही सरकारची इच्छा’ : उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करीत होते. बच्चू कडू यांच्यासह अन्य काहींना त्यांच्याकडे चर्चेसाठी पाठविले होते. या प्रक्रियेला वेळ जात आहे. त्यामुळे आणखी वेळ देण्याची मागणी केली होती. परंतु, मराठा समाज ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने जरांगे पाटील यांच्यासह मुंबईला चालला आहे. अजूनही त्यांनी थांबावे, अशी सरकारची इच्छा आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना अनेकदा समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आरक्षणाबाबत राज्य सरकार काय करीत आहे, हे सांगितले. राज्य सरकारच्या कामाला प्रतिसाद द्यावा, मुंबईकडे कूच करू नये, असे आवाहन केले. मागासवर्ग आयोगासंदर्भातील माहिती काढण्यासाठी काही वेळ लागतो. परंतु, जरांगे पाटील हे ’जेवढा वेळ पाहिजे तेवढा दिलेला आहे,’ असे सांगत मुंबईकडे निघाले आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे.
संविधानाचा आदर राखून प्रत्येक जण आपला निर्णय घेऊ शकतो. आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यांनी अजूनही थांबावे, अशी सरकारची इच्छा आहे. परंतु, आज मराठा समाज ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. शेवटी प्रत्येकाला आपापली भूमिका घेण्याचा अधिकार आहे.
मंत्रिमंडळासह अयोध्येला जाणार
अयोध्येेतील श्रीराम प्रतिष्ठापनेसाठी मुख्यमंत्री व मला निमंत्रण आले होते. परंतु,अन्य मंत्र्यांना सोमवारी तेथे नेणे शक्य नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यापुढील काळात सगळ्या मंत्रिमंडळाला घेऊन अयोध्येेला जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तारीख ठरवून लवकरच आम्ही जाऊ, असे सांगत अजित पवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ मंदिर उभारणीचा निश्चय केला. तो यानिमित्ताने पूर्णत्वाकडे जात आहे. राज्य शासनाने सुटी जाहीर केली असून, शासकीय इमारतींवर रोषणाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा
सर्वात धोकादायक पुलाचा व्हिडीओ!
आर्टिफिशियल इंटेलिजेन्स करणार हस्ताक्षराचीही कॉपी!
पर्यटनस्थळ नव्हे, रेल्वेस्थानक!
Latest Marathi News ‘मराठ्यांनी थांबावे, ही सरकारची इच्छा’ : उपमुख्यमंत्री अजित पवार Brought to You By : Bharat Live News Media.