सातारा : जिल्हा रामभक्तीमय; सर्वत्र रामनामाचा जयघोष
सातारा; Bharat Live News Media वृत्तसेवा : अयोध्या येथे आज रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. त्यामुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा रामभक्तीमय झाला असून सर्वत्र रामनामाचा जयघोष सुरू आहे. सातारकरांच्या मुखी ‘जय श्रीराम’चा जप आहे. यानिमित्त जिल्ह्यातील सर्वच मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील शहरे व ग्रामीण भागात ठिकठिकाणी भगवे झेंडे, स्वागत कमानी व श्रीरामाचे कटआऊटस् लक्षवेधक ठरत आहेत.
सोमवार, दि. 22 रोजी होत असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी सातारा रामभक्तीमय झाली आहे. अयोध्येत भव्यदिव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार असल्याने जिल्ह्यातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे मंदिर परिसर चकाचक झाला आहे. तसेच मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत रोषणाईने मंदिरे उजळून निघाली आहेत. सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रभू श्रीरामाचे भव्य कटआऊटस लावण्यात आले असून ते लक्षवेधक ठरत आहे. ठिकठिकाणी स्वागत कमानी, प्रभू श्रीरामाचा फोटो असलेले झेंडे, बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वत्र राममय वातावरण झाले आहे.
सातार्यातील काळाराम मंदिर, गोरा राम मंदिर, माहुलीतील श्रीराम मंदिर यासह जिल्ह्यात ठिकठिकाणच्या मंदिरात धार्मिक कार्यक्रम होत आहेत. सोमवारी विविध मंदिरात राम नामाचा जप, प्रवचन, किर्तन, भजन, रामरक्षा मंत्र, यज्ञ, अभिषेक यासह विविध कार्यक्रम होणार आहेत. बहुतांश ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. काही गावांमध्ये श्रीराम मूर्तीच्या मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Latest Marathi News सातारा : जिल्हा रामभक्तीमय; सर्वत्र रामनामाचा जयघोष Brought to You By : Bharat Live News Media.